सोलापूर : अवैध गर्भपात प्रकरणामुळे सोलापूर जिल्हा चर्चेत असताना आणखी एक असंच प्रकरण समोर आलं आहे. जिल्ह्यातील अकलूज येथे 36 अवैध गर्भपात प्रकरणी डॉक्टर गांधी दाम्पत्याची चौकशी सुरु आहे. त्यातच आता माळशिरस परिसरात 9 महिलांच्या अवैध गर्भपात प्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.


माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील डॉक्टर विजयसिंह भगत आणि मेडद येथील डॉक्टर सुखदेव कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची कुणकुण लागताच दोन्ही डॉक्टर हॉस्पिटलला कुलूप ठोकून पळून गेल्याने आता पोलिसांनी त्यांचा शोध घेणं सुरु केलं आहे.

माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी, खुळेवाडी, उंबरे दहिगाव परिसरातील 9 महिलांचा अवैध गर्भपात केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सिव्हिल सर्जन डॉक्टर मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांनी माळशिरस पोलीस ठाण्यात भादंवि 312 , 201 आणि वैद्यकीय गर्भपात अधिकार 1971 ( 5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

ही गर्भपाताची प्रकरणं 9 ऑगस्ट 2016 ते 13 जानेवारी 2017 या पाच महिन्यांच्या कालावधीतील आहेत. त्यामुळे या प्रकरणांचा शोध लावण्याचं पोलिसांसमोर आता आव्हान आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्हा राज्यातील अवैध गर्भपातामुळे चर्चेत होता. अकलूज आणि आता माळशिरस येथे सापडलेल्या 2 रॅकेटमुळे जिल्ह्यात अजून किती दवाखान्यात असे अवैध गर्भपाताचे प्रकार सुरु आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या :


अकलूज बनले 4 जिल्ह्याचे गर्भपात केंद्र?


अकलूजमध्ये 36 महिलांचा गर्भपात करणारं डॉक्टर दाम्पत्य अटकेत