फटाके उडवताना ड्रेस पेटला, नवी मुंबईत चिमुरडीचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 03 Nov 2016 08:48 AM (IST)
नवी मुंबई : फटाके उडवताना लहान मुलांनी किंवा त्यांच्या पालकांनी जरासाही निष्काळजीपणा बाळगला, तर ते कशाप्रकारे जीवावर बेतू शकतं याचं उदाहरण नवी मुंबईत पाहायला मिळत आहे. फटाका उडवताना ड्रेसवर ठिणगी पडून ड्रेस पेटल्याने 8 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत कळंबोलीतल्या चंद्रोदय सोसायटीत राहणाऱ्या अंकिता चौधरीला या घटनेत जीव गमवावा लागला. शनिवारी म्हणजेच नरक चतुर्दशीच्या रात्री 8 वर्षांची अंकिता घराजवळच मित्रमंडळींसोबत फटाके उडवत होती. त्याचवेळी एक फटाका उडून अंकिताच्या कपड्यांवर पडला आणि तिच्या ड्रेसने पेट घेतला. ड्रेस पेटल्याने गंभीर जखमी झालेल्या अंकिताला तिच्या पालकांनी तात्काळ ऐरोलीच्या नॅशनल बर्न्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र सहा तासांच्या झुंजीनंतर रविवारी तिने अखेरचा श्वास घेतला. रबाळे पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. दिवाळीच्या काळात नॅशनल बर्न्स सेंटरमध्ये 26 भाजल्याच्या घटनांची नोंद केली आहे.