वर्धा : सात अल्पवयीन मुलांना झारखंडमधून सुरतमध्ये घेऊन जात असल्याच्या संशयावरून आरपीएफ आणि जीआरपीच्या टीमने एकाला ताब्यात घेतले आहे. मालदा सुरत एक्स्प्रेसमध्ये ही कारवाई करण्यात आली. चाईल्ड ट्रॅफिकिंग अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झारखंड राज्यातून 7 अल्पवयीन मुलं मालदा एक्स्प्रेसमधून सुरतला जात असल्याची माहिती रेल्वेच्या आरपीएफ आणि जीआरपीला मिळाली होती.

यामध्ये बासू तुरी या इसमाला झारखंडच्या मुलांना बिहार येथील धनबाद रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीने आणून दिले. त्या मुलांना सुरतला एका व्यक्तीकडे सोपवण्यास वासू तुरी याला सांगितले. अशी माहिती चौकशीत समोर आली.

यावरून प्रथम दर्शनी हा प्रकार चाईल्ड ट्रॅफिकिंगचा असल्यानं गुन्हा दाखल करण्यात आल्याचं लोहमार्गचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट यांनी सांगितले.

मुलांच्या पालकांना बोलावून मुलांना त्यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. सध्या मुलांना बालगृहात ठेवण्यात आले आहे.

यातील एका मुलाला विचारपूस केली असता, शाळेत जाण्याची इच्छा आहे, पण  परिस्थिती गरिबीची असल्याने काम करण्यासाठी जात असल्याच सांगितलं. कोवळ्या वयात घरातील कर्ज असल्याची परिस्थिती समजून ते काम करण्यासाठी जाण्यास तयार झाल्याचं सांगतात.

आणखी एका चिमुरड्याशी संवाद साधला असता, अत्यंत धक्कादायक माहिती त्याने सांगितली. तो म्हणाला, “बहिणीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडणण्यासाठी काम करण्यास जावं लागतं. घरच्यांनीही छातीवर दागड ठेवत दोन पैसे मिळतील म्हणून कामावर पाठवलं आहे.”

दरम्यान, एका आरोपीला ताब्यात घेतले असून, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट पुढील तपास करत आहेत.