पंढरपूर : पंढरपूर-सोलापूर मार्गावर कार आणि एसटीच्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. सुरेश रामचंद्र कोकणे , सचिन सुरेश कोकणे, सविता सचिन कोकणे, आर्यन सचिन कोकणे, श्रद्धा राजेश सावंत आणि प्रथम राजेश सावंत अशी या मृतांची नावे आहेत. तर धनश्री राजेश सावंत ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहे. मुंबईमधील घाटकोपर परिसरात राहणारे सुरेश कोकणे यांचा लक्ष्मी केटरर्स फर्म आहे. ते आज आपल्या कुटुंबासह अक्कलकोट येथून पंढरपूरकडे दर्शनाला येत असताना दुपारी साडेचारच्या दरम्यान पंढरपूर जवळील ईश्वरवठार परिसरात हा भीषण अपघात झाला. पंढरपूरकडून अक्कलकोटला निघालेल्या बसला कोकणे यांच्या कारने समोरून धडक दिल्याने त्यांची गाडी थेट बसमध्ये घुसून बसली होती. जोरदार आवाजाने जवळपासच्या ग्रामस्थांनी तातडीने मदत करीत पहिल्यांदा गाडीतील जखमींना बाहेर काढायचा प्रयत्न केला. मात्र जागीच पाच जणांचा मृत्यू झाल्याचे दिसून आल्यावर यातील जखमी तरुण आणि तरुणीला तातडीने उपचारासाठी पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले . उपचार सुरु असताना यातील तरुणाचाही मृत्यू झाला. गंभीर अवस्थेतील जखमी तरुणी धनश्रीला उपचारासाठी सोलापुरात हलविण्यात आले आहे.