नागपूर : नागपुरातलं मानवी तस्करीचं मोठं रॅकेट समोर आलं आहे. तब्बल 50 तरुणांची लंडनमध्ये तस्करी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे नागपूरमध्ये एकच खळबळ माजली आहे.


आपला मुलगा असल्याचं दाखवून मुलांना लंडनला घेऊन जायचं. व्हिसा संपल्यानंतरही त्यांना तिथेच ठेवायचं. त्यांना मजुरीला लावायचं आणि पुन्हा भारतात परतायचं.

गेल्या 10 वर्षात10 शीख परिवारांनी तब्बल 50 मुलांची अशी तस्करी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

आतापर्यंत कोणी-कोणी किती मुलांची तस्करी केली?

राजेंद्र आणि गुरमित कौर अटवाल             8 मुले

रुलडा सिंग आणि परमित गुजर                 19 मुले

जर्नल सिंग आणि सुरिंदर कौर धोत्रा            6 मुले

पियर सिंग आणि जविंदर कौर धोत्रा            6 मुले

सतविंदर सिंग आणि परमजित कौर धोत्रा      2 मुले

मनजीत आणि कुलजित धोत्रा                    3 मुले

निशांत आणि सावन कौर धोत्रा                 3 मुले 

काश्मीर सिंग आणि मनजीत कौर धोत्रा        2 मुले

अजित सिंग आणि निर्मल कौर धोत्रा            4 मुले

बलबीर सिंग आणि जसविंदर मुलतानी        5 मुले

या सर्वांनी मुलांना लंडनमध्ये नेल्याचा आरोप आहे. लंडन पोलिसांनी जेव्हा या दाम्पत्याच्या माहितीची छाननी केली तेव्हा त्यातल्या एका दाम्पत्याच्या दोन मुलांमधलं अंतर अवघं 3 महिने आढळलं आणि इथूनच या रॅकेटचा भांडाफोड झाला. ही सर्व दाम्पत्य इंग्लंडमधून अमेरिका, अबू धाबीला गेल्याचंही समोर आलं आहे.

दुसरीकडे भारतातून लंडनला नेलेली ही सगळी मुले मजुरीवर असल्याचं कळतं आहे. कुणी सेंट्रिंगच्या कामावर, तर कुणी स्वच्छतेच्या कामावर.  ही सर्व माहिती ब्रिटिश हाय कमिशनने नागपूर  क्राईम ब्राँचकडे पाठवल्यानंतर त्यातील कागदपत्र हे बनावट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा आता नागपूर पोलीस कसून तपास करत आहेत. त्यामुळे यामागचा नेमका सूत्रधार कोण हे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.