मुंबईः पुण्यातील टेमघर वगळता राज्यातील धरणं सुरक्षित असल्याचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा दावा पोकळ ठरला आहे. राज्यातील तब्बल 400 धरणे असुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणात समोर आली आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (मेरी) केलेल्या सर्वेक्षणाचा हा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.

 

काय आहे 'मेरी'चा अहवाल?

नाशिकमध्ये दिंडोरी रोडवर असलेल्या 'मेरी'ची स्थापना 1980 मध्ये झाली. नवीन धरणांसाठीचा आराखडा तयार करणे, धरणांची सुरक्षितता तपासणे, संभावित धोके ओळखणे आणि त्यावर उपाय सुचवणे, अशी कामे 'मेरी'कडून केली जातात. मेरीतर्फे धरणांचे मान्सूनपूर्व आणि मान्सुनोत्तर परीक्षण केलं जातं.

 

'मेरी'ने राज्यातील 3102 धरणांचं मान्सूनपूर्व परीक्षण केलं आहे. त्याचा अहवाल मेरीने राज्य सरकारला सादर केला. राज्यातील 400 धरणांच्या ठिकाणी किरकोळ ते गंभीर स्वरुपाच्या दुरुस्त्या करणे आवश्यक आहे. या दुरुस्त्या तातडीने करण्याची शिफारस 'मेरी'ने अहवालात केली आहे.

 

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणातून पाणीगळती सुरू झाल्यामुळे धरणांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला. टेमघर धरणाबाबतही जलसंपदा विभागाने गांभीर्याने बघितलं नाही; पण धरणाच्या गळतीची चर्चा झाल्यानंतर सरकारने गळती थांबविण्यासाठी 100 कोटींची निविदा काढली. आता 400 धरणांच्या दुरुस्तीबाबत राज्य सरकार काय भूमिका घेणार, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.