माहितीनुसार, औद्योगिक वसाहतीतील ओम साई राम स्टील कंपनीत बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळ्या तयार केल्या जातात. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सळ्या करण्यासाठी वितळवण्यात आलेलं लोखंड भट्टीमधून बकेटमध्ये ओतल्यानंतर ते उतू गेले. त्यामुळे भट्टीतले तप्त लोखंड वितळले. हे वितळलेले लोखंड जवळ काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर पडले. यात 4 कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर या घटनेत इतर 8 कामगार जखमी झाले. जखमींपैकी 3 गंभीर कामगारांवर औरंगाबाद तर उर्वरित 5 कामगारांवर जालना येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेतील मृतांची संख्या वाढण्याचा अंदाज असून या घटनेमुळे पुन्हा कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.