3rd August Headline : आज विधानसभेत विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. विरोधी पक्ष नेत्याच्या नावाची घोषणा बुधवारीदेखील झाली नाही. त्यामुळे काँग्रेसचे विजय वड्डेवाटीवार विरोधी पक्ष नेते म्हणून अंतिम आठवडा सादर करण्याची संधी मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. संसदेच्या मान्सून अधिवेशनात आजही मणिपूर प्रश्नावरुन गदारोळ होण्याची शक्यता आहे.
संसदेचे मान्सून अधिवेशन
- मणिपूर प्रश्नावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ सुरूच राहू शकतो.
- भाजपने आज लोकसभेच्या खासदारांसाठी व्हीप जारी केला आहे.
- संसद भवनात आज सकाळी विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. संसदेच्या कामकाजातील रणनीती ठरवण्यासाठी बैठक होणार आहे.
ज्ञानवापी प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय
प्रयागराज - ज्ञानवापी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आज निकाल येण्याची शक्यता आहे. वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण करण्याच्या आदेशाविरोधातील मशीद समितीच्या याचिकेवर न्यायालयाचा निर्णय येणार आहे.
विधिमंडळ अधिवेशन
- आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रास्ताव मांडला जाणार असून विरोधकाकडून संभाजी भिडे यांचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता आहे. भिडे ना अटक करण्याची मागणी विरोधक करत आहेत. तर, विरोधी पक्ष नेत्यांची निवड विधानसभा अध्यक्षांकडून जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विधानसभा अध्यक्ष हे विजय वड्डेवाटीवार यांना विरोधी पक्ष नेते म्हणून बोलण्याची संधी देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून मविआ आमदारांच्या बैठकीचे आयोजन
मुंबई - महाविकास आघाडीच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. काँग्रेसने आजच्या बैठकीचे आयोजन केलं आहे. नाना पटोले यांच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे.
नव्या आमदार निवासाचे बांधकाम शुभारंभ
आज मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थित सकाळी हा कार्यक्रम पार पडणार आहे. 40 मजली आणि 28 मजली अशा दोन इमारती बांधण्यात येणार आहे. 1 हजार चौरस फुटाचा फ्लॅट असणार आहे.
संभाजी भिडे सांगलीमध्ये दाखल
सांगली - आपल्या अनेक वक्तव्यांनी चर्चेत आलेल्या आणि वादग्रस्त बनलेले संभाजी भिडे सांगलीमध्ये दाखल झाले आहेत. बुधवारी सोलापूरमध्ये धारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
संभाजी भिडे चिपळूण दौऱ्यावर
रत्नागिरी - आज संभाजी भिडे चिपळूण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला आजून परवानगी मिळालेली नाही.
अहमदनगरमध्ये आंदोलनाचा दिवस
- महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ सकाळी 11 वाजता फुले ब्रिगेडच्या वतीने आंदोलन केलं जाणार आहे. यावेळी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक घातला जाणार आहे.
- हरयाणातील मेवातच्या नुह येथे बजरंग दलाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी धार्मिक ब्रजमंडल यात्रा या धार्मिक यात्रेवर दगडफेक, हिंसाचार, जाळपोळ आणि थेट गोळ्या झाडल्याच्या निषेधार्थ दुपारी बजरंग दल नगर शहराच्यावतीने दिल्ली गेट येथे आंदोलन करण्यात येणार आहे.