अकोला : अकोला जिल्ह्यातील शहापूरमध्ये वाळू उत्खननाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बृहत धरणातील पात्रात चक्क भुयार आढळून आले आहे. वाळू माफियांनी वाळू उपसा करुन हे भुयार तयार केल्याची माहिती मिळत आहे. सध्या धरणात पाणी नसल्यामुळे वाळू माफियांनी याचा फायदा घेत तब्बल 20 ते 30 फूट खोल भुयार खोदले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे धरणाच्या भिंतीपर्यंत वाळू माफियांनी भुयार खोदले आहे. यामुळे धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.


261 कोटी रुपये खर्च करुन धरणाची निर्मिती करण्यात आली होती. या धरणाची लांबी 55.10 मीटर आणि उंची 17.23 मीटर आहे. धरणाची एकूण क्षमता 2.790 द.ल.घ.मी. आहे. सध्या धरणात पाणीसाठा न झाल्याने, त्यात गाळ झाला आहे. याचाच फायदा घेत वाळू माफियांनी धरण पात्रात अक्षरश: 20 ते 30 फूट खोल असे सुरुंग तयार करून वाळूचा उपसा केला. या भुयाराला वाळू माफियांनी विशिष्ट आकार दिले आहे. तसेच आतमधून वाळू काढण्याकरिता पायर्‍या सुद्धा तयार केल्या आहेत.

या प्रकल्पाच्या देखरेखीची जबाबदारी पाटबंधारे विभागाकडे आहे. महसूल विभागाने येथील वाळू उत्खननासंदर्भात अनेकदा पोलीस आणि पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार केला होता. मात्र या दोन्ही विभागाच्या दुर्लक्षामुळे वाळू माफियांची हिंमत वाढल्याने हा प्रकार घडला आला आहे.

जिल्हा प्रशासनाने आज या धरणाच्या सांडवा पात्रातील ही सर्व भुयारे उध्वस्त केली आहेत. तसेच अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे अहवाल मागविले आहेत. आता यावर संबंधित यंत्रणा कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.