मुंबई: संपूर्ण देशाकडून प्रजासत्ताक दिन साजरा केला जात असताना, राज्यातल्या काही पालकमंत्र्यांनी झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली. औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबादच्या पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणाला दांडी मारल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करावं लागलं.


औरंगाबादचे पालकमंत्री  रामदास कदम यांनी तब्येत ठीक नसल्याचं कारण देत शासकीय झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली. तर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री तसंच बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी देखील तब्येतीचं कारण देत बीडचा नियोजित दौरा रद्द केला. त्यामुळं जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला.

तर उस्मानाबादचे पालकमंत्री  दिवाकर रावते  परिवहन विभागाच्या झेंडावंदनाला उपस्थित राहिल्यामुळं ते उस्मानाबादमधील झेंडावंदनाच्या कार्यक्रमला हजर राहू शकले नाही.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या शासकीय कार्यक्रमांना पालकमंत्र्यांनी दांड्या मारल्याने, नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे.