2nd August Headline : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होत आहे. या आठवड्यात तीन दिवस कामकाज होणार आहे. आज राज्याच्या नव्या विरोधी पक्षाच्या नेत्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे संसदेत मणिपूर आणि इतर मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी टिळक पुरस्कार कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर आज सायंकाळी महाविकास आघाडी बैठक होणार आहे.
>> विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आजपासून
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होत आहे. या आठवड्यात तीन दिवस कामकाज होणार आहे. आज विरोधक संभाजी भिडे आणि समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर कॉग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा केल्यानंतर आज अध्यक्षांकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राहुरी प्रकरणाचा तपास करण्यासाठी निलम गोऱ्हे यांनी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आज येण्याची शक्यता आहे.
>> संसदेचे पावसाळी अधिवेशन
विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीच्या नेत्यांची सकाळी 10 वाजता राज्यसभेच्या विरोधी पक्ष नेत्याच्या कार्यालयात बैठक होणार आहे. सभागृहातल्या विरोधकांच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे.
दिल्ली राज्य सरकारच्या अखत्यारीत अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंग विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार आहे. त्यावर आज सभागृहात चर्चा होणार आहे. या विधेयकाला सर्व विरोधी पक्षांचा विरोध आहे.
>> महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक
आज महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक विधान परिषदेचे आयोजन विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे यांनी केलं आहे. बैठकीत काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, अबू आझमी, शेकापचे नेते जयंत पाटील, शिवसेना उबाठाचे गटनेते अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड तसेच विधानपरिषदेचे सदस्य शिवसेना आमदार अनिल परब, एकनाथ खडसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या बैठकीला शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ही बैठक पार पडणार आहे.
>> वंचित घटकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
देशात दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसी समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे. संविधान बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसी समाजाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येणार आहे.
>> आज कोर्टातील महत्त्वाची सुनावणी
समीर वानखेंविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणांत आपलीही साक्ष नोंदवा अशी मागणी जेष्ठ आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे, त्यावर आज सीबीआय आपली भूमिका मांडणार आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांची आज मुंबई सत्र न्यायालयात हजेरी. चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर यांच्यासह व्हिडिओकॉनचे वेणूगोपाल धूत यांच्याविरोधात सीबीआय आणि ईडीनं गुन्हा दाखल केला आहे