22nd July Headline: मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली  आहे. हवामान विभागाने आजही काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज इर्शाळवाडीला भेट देणार आहेत. यावेळी ते स्थानिकांशी संवाद साधणार आहेत. तर, दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. 



आजही मुसळधार पाऊस, काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, शाळांना सुट्टी


- पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट दिल्याने आजही जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 


- चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ च्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा-महाविद्यालयांनी सुट्टी जाहीर केली आहे. 


- मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट  जारी करण्यात आला आहे. त्याशिवाय आज रत्नागिरीतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


- पुण्यात आज आज घाट परिसरात  तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 


 


उद्धव ठाकरे यांचा इर्शाळवाडीचा दौरा


शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज इर्शाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त वाडीला भेट देणार आहेत. इर्शाळवाडी जवळील पंचायत मंदिर नढाळ पासून पाच किलोमीटर वर बचावलेल्या ग्रामस्थांना ठेवण्यात आले आहे. तिथे पहिले उद्धव ठाकरे जाणार आहेत. 



पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वाटप


दिल्ली - रोजगार मेळाव्यात सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये 70,000 हून अधिक नव्याने भरती झालेल्या लोकांना पंतप्रधान मोदी नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 70,000 हून अधिक नवनियुक्त व्यक्तींना नियुक्ती पत्रांचे वाटप करतील. देशभरात 44 ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित केला जाणार आहे.


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर असणार आहेत. अहेरी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयाचे उद्घाटन समारंभात उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, अहेरी येथील पोलीस वसाहतीतील 4 नवीन इमारतीचे उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सिरोंचा तालुक्यातील झिंगाणूर पोलीस मदत केंद्रात नवीन पोलीस स्टेशन इमारतीचा उद्घाटन पार पडणार आहे


सोलापूरमध्ये 'जी ट्वेंटी युवा संवाद- भारत @2047' कार्यक्रमाचे आयोजन


सोलापूर -  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विकासार्थ विद्यार्थी यांच्यातर्फे 'जी ट्वेंटी युवा संवाद- भारत @2047' या कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले आहे. याचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार प्रणिती शिंदे उपस्थित राहणार आहेत.