मुंबई : गणेशोत्सव आता अगदी आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. मुंबईकर चाकरमान्यांना आता गावी जाण्याचे वेध लागले आहेत. गणेशोत्सवासाठी गावी जाताना चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वे आता सज्ज झाली आहे. यासाठी नियोजित रेल्वे गाड्यांसोबतच काही विशेष गाड्याही सुरू करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेवर 210 फेऱ्या होणार आहेत तर रेल्वे गाड्यांना 647 अतिरिक्त डबेही जोडले जाणार आहेत. त्याचसोबत दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला 30 ऑगस्टपासून सावंतवाडीत थांबा देणार आहेत. याचा सात लाखांहून अधिक प्रवाशांना लाभ होणार आहे.

माहितीनुसार रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कोकण रेल्वे मार्गावर नियोजित गाड्यांबरोबरच खास रेल्वे गाड्या सुरु केल्या आहेत. तिकीटांसाठी ज्यादा बुकिंग खिडक्या उघडण्तण आल्या आहेत. तसेच 11 टपाल खात्यात, 17 रेल्वे स्थानकात पीआरएस सिस्टम आणि 16 ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी सुरु केली आहे. या दरम्यान तिकीट तपासणी कडक केली जाणार आहे. तसेच खाद्यपदार्थ स्टॉलवर बेबी फुड उपलब्ध असेल, अशी माहिती आहे.

खेड, कणकवली व कुडाळ रेल्वे स्थानकांवर प्रथोमपचार सुविधा दिली जाणार आहे. त्याशिवाय चिपळूण, रत्नागिरी, थिवी, वेर्णा, मडगाव, कारवार आणि उडुपी रेल्वे स्थानकावर आरोग्य कक्ष असणार आहे.  सुरक्षतेच्या दृष्टीने कुठलीही कमतरता राहू नये यासाठी रेल्वे सरंक्षण खास फोर्स तैनात केले जाणार आहे. या फोर्सला रेल्वे सुरक्षा दल सहकार्य करणार असल्याची माहिती आहे.

कोकण रेल्वे महामंडळाच्या अन्य स्थानकावरील रेल्वे सुरक्षा दलाचे जवान मुख्य रेल्वे स्थानकावर तैनात केले जाणार आहे. सुरक्षतेसाठी रेल्वे सुरक्षा दलाचे एकूण 204 जवान आणि सोबत होमगार्डचे जवान तैनात करण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस सुरक्षतेवर लक्ष ठेवणार आहे.