20th August In History : आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी आजच्या दिवशी ब्राह्मो समाजाची स्थापना केली, समाजातील चुकीच्या रुढी, प्रथा बंद करण्यासाठी ब्राह्मो समाजाने मोठे काम केले. भारतात माहिती तंत्रज्ञानाचे अवकाश खुले करणारे, देशाचे सहावे आणि सगळ्यात तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज जन्मदिन आहे. तर, आजच्या दिवशी महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना घडली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
1666: आग्र्याहून निसटल्यानंतर शिवाजी महाराजांनी शेवटचे मुघल ठाणे ओलांडले
औरंगजेबाच्या हाती तुरी देऊन आग्र्याहून निसटल्यानंतर शिवाजी महाराजांनी नियोजनानुसार दख्खनच्या दिशेने वाटचाल सुरू केली. आग्र्यातील सुटकेनंतर तिसऱ्या दिवशी मुघलांच्या अख्यत्यारीत असलेल्या नरवीर घाटी हे ठाणे खोटे दस्तऐवज दाखवून ओलांडले.
1828 : राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली
ब्राह्मो समाज ही बंगालच्या प्रबोधनकाळात सुरू झालेली एकेश्वरवादी सुधारणावादी चळवळ होती. ही भारतातील सर्वात प्रभावशाली धार्मिक चळवळींपैकी एक होती आणि याने आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. 20 ऑगस्ट 1828 रोजी कलकत्ता येथे राजा राम मोहन रॉय आणि द्वारकानाथ टागोर यांनी तत्कालीन प्रचलित चालीरीतींमध्ये (विशेषतः कुलीन प्रथा) सुधारणा म्हणून ब्राम्हो समाज सुरू केला आणि 19 व्या शतकातील बंगालच्या प्रबोधनाची सुरुवात सर्व धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी केली.
वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धेने विभक्त झालेल्या लोकांना एकत्र करणे आणि समाजात पसरलेल्या वाईट गोष्टी दूर करणे हे त्याचे उद्दिष्ट होते. त्यांनी ब्राह्मण समाजातील सती प्रथा, बालविवाह, जातिव्यवस्था आणि इतर सामाजिक अशा अनेक धार्मिक प्रथा बंद केल्या.
1944 : भारताचे सहावे पंतप्रधान राजीव गांधी यांचा मुंबई येथे जन्म
भारताचे सहावे पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज जन्मदिन. राजीव गांधी हे भारताचे सर्वात कमी वयाचे पंतप्रधान आहेत. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. इंदिरा गांधीच्या निधनानंतर 31ऑक्टोबर 1984 रोजी त्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एरलाइन्समध्ये वैमानिक होते. आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी मात्र राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते. अखेर 1980 मध्ये भाऊ संजय गांधी याच्या निधनानंतर राजीवने राजकारणात प्रवेश केला. पुढे आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते 1984 मध्ये पंतप्रधान बनले.
राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरुवात ही त्यांच्या धोरणांतून झाली. लायसन्स राज संपवण्याचा प्रयत्न करत त्यांनी आयातीचे नियम शिथिल केले.
1991 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तामिळनाडू येथील एका प्रचार सभेच्या वेळी त्यांची श्रीलंकेतील फुटीरतावादी संघटना लिट्टेकडून हत्या करण्यात आली.
1946 : इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांचा जन्म
नागवार रामराव नारायणमूर्ती ऊर्फ एन.आर. नारायणमूर्ती हे भारतीय उद्योजक, सॉफ्टवेर अभियंता आणि इन्फोसिस टेक्नॉलॉजीज कंपनीचे संस्थापक आहेत. सर्वात श्रीमंत व्यावसायिक, उद्योजकांपैकी एक आहेत. मूर्ती यांचा जन्म कर्नाटकातील शिडलघट्टा येथे झाला. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग, म्हैसूर विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर येथून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
इन्फोसिस कंपनी सुरू करण्यापूर्वी, मूर्ती यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद येथे चीफ सिस्टम प्रोग्रामर म्हणून आणि पुणे, महाराष्ट्रातील पटनी कॉम्प्युटर सिस्टम्समध्ये काम केले. त्यांनी 1981 मध्ये इन्फोसिस सुरू केली आणि 1981 ते 2002 पर्यंत सीईओ तसेच 2002 ते 2011 पर्यंत चेअरमन होते. 2011 मध्ये ते संचालक मंडळातून पायउतार झाले आणि चेअरमन एमेरिटस झाले. जून 2013 मध्ये मूर्ती यांची पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
फॉर्च्यून मासिकाने मूर्ती यांचा आमच्या काळातील 12 महान उद्योजकांमध्ये समावेश केला. भारतातील आउटसोर्सिंगमधील योगदानाबद्दल टाईम मॅगझिन आणि सीएनबीसी यांनी त्यांचे "भारतीय आयटी क्षेत्राचे जनक" म्हणून वर्णन केले.
2013: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या
नरेंद्र अच्युत दाभोळकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेसोबत काम करू लागले. 1982 मध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही डॉ. श्याम मानव यांनी स्थापन केली. पुढे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी 1989 मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. या संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते.
1970 साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला
बाबा आढाव यांच्या एक गाव - एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या 1982 साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर 1998 पासून मृत्यूपर्यंत संपादक होते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी कोणत्याही धर्माला विरोध केला नाही. मात्र, धर्माच्या नावाखाली, दैवी चमत्काराच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीला, शोषणाला, अंधश्रद्धेला विरोध केला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून भोंदूगिरी उघड करणारे अनेक प्रयोग, जनजागृतीचे प्रात्याक्षिक सादर करण्यात येतात.
डॉ. दाभोलकर यांनी अंधश्रद्धेविरोधात मुबलक लिखाणही केले. अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, ऐसे कैसे झाले भोंदू , अंधश्रद्धा विनाशाय , तिमिरातुनी तेजाकडे, प्रश्न तुमचे उत्तर दाभोलकरांचे, भ्रम आणि निरास, आदी पुस्तकांचे लिखाण केले आहे.
अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवणाऱ्या दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात मॉर्निंग वॉक सुरू असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. काही वर्षांपूर्वी तपास यंत्रणांनी हत्येच्या प्रकरणात काहींना अटक केली. मात्र, अद्यापही सूत्रधारांचा शोध लागला नसल्याचे सामाजिक चळवळीत नाराजी व्यक्त केली जात आहे.
2013 : 'कालनिर्णय'कार जयंत साळगावकर यांचे निधन
ज्योतिषतज्ज्ञ, लेखक, पत्रकार व उद्योजक जयंत साळगांवकर यांचा आज स्मृतीदिन. कालनिर्णय'' या सुमारे नऊ भाषांतून निघणाऱ्या आणि केवळ मराठी भाषेतच 48 लाख प्रतींचा खप असलेल्या वार्षिक दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) संस्थापक-संपादक होते. 1973 पासून या दिनदर्शिकेचे प्रकाशन होत आहे. साळगावकर हे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांच्या कार्यात ते उत्साहाने सहभागी होत होते. श्री सिद्धिविनायक मंदिर, मुंबई ह्या संस्थेचे माजी ट्रस्टी होते. त्याशिवाय, महाराष्ट्र गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष, दादर-माटुंगा कल्चरल सेंटर संस्थेचे विश्वस्त, महाराष्ट्र व्यापारी मित्रमंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पडली आहे.
2014 : भारतीय योग प्रशिक्षक बी. के. अय्यंगार यांचे निधन
बेल्लूर कृष्णमाचार सुंदरराजा अय्यंगार हे एक भारतीय योग प्रशिक्षक व लेखक होते. त्यांना अय्यंगार योगा ह्या हठ योग पद्धतीचे जनक मानले जाते. अय्यंगार हे जगातील सर्वोत्तम योग प्रशिक्षकांपैकी एक मानले जात असत. भारतभर व जगभर योगासने लोकप्रिय करण्याचे श्रेय अय्यंगारांना दिले जाते.
अय्यंगारांच्या योगामधील अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने त्यांना 1991 साली पद्मश्री, 2002 साली पद्मभूषण तर 2014 साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वयाच्या ९६व्या वर्षी हृदयधक्क्याने त्यांचे निधन झाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
1897 : सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.
1941: दुसरे महायुद्ध – फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली
1960: सेनेगलने आपण मालीपासून स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
1988: आठ वर्षांच्या युद्धानंतर इराण-इराक युद्धबंदी करार झाला.
1995: भारतातील फिरोजाबाद रेल्वे अपघातात 258 जणांचा मृत्यू झाला.