मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki bahin yojana) योजना सध्या लोकप्रिय ठरत असून महिला भगिनींसह त्यांच्या कुटुंबातील पुरुष सदस्यही घरातील महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कागदपत्रांची पूर्तता करत आहेत. राज्य सरकारने घोषित केलेल्या या योजनेसाठीची कागदपत्रे मिळवण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. त्यानंतर, या योजनेसाठी नियमांत काही बदल करुन सरकारने ही योजना आणखी सहज व सुलभ केली आहे. तसेच, जास्तीत जास्त महिला (Women) भगिनींना याचा लाभ मिळावा, यासाठी काही अटी व शर्तीतही बदल केला आहे. त्यानुसार, आता कुटुंबातील अविवाहित महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी, वय वर्षे  21 ते 65 पर्यंतची मर्यादा देण्यात आली आहे. स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी याबाबत माहिती दिली. त्यासाठी, ऑनलाईन किंवा पंचायत समिती कार्यालयातील महिला व बालकल्याण विभागात जाऊन अर्ज करता येईल.


अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतेच विद्यमान राज्य सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये, महिला, शेतकरी आणि गृहिणींसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वात मोठा आणि क्रांतिकारी निर्णय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा होय. या निर्णयाच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शासनाने ही योजना आणखी सुलभ करण्यासाठी योजनेच्या निकषांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार, आता 21 ते 65 वर्षांपर्यंतच्या सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर, एका कुटुंबातील 2 महिलांना याचा लाभ मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 



कुटुंबातील 2 महिला सदस्यांना लाभ


यापूर्वी कुटुंबातील केवळ विवाहित महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता 21 वर्षे पूर्ण केलेल्या अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुसार, एका कुटुंबातील दोन महिलांना ह्या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एक विवाहित आणि एक अविवाहित महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. आम्ही कुटुंब नियोजन करुन चूक केली का, असा जो सवाल येतो त्याच प्रश्नाचं उत्तरही यातून दिलंय, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच, 1 जुलैपासून पुढील 60 दिवसांत जे अर्ज करतील, त्यांना 1 जुलैपासूनचे पैसे मिळतील आणि 1 ऑगस्टनंतर जे अर्ज करतील, त्यांना अर्ज केल्यानंतरच्या महिन्यापासून पैसे मिळतील, अशी माहितीही फडणवीस यांनी विधानपरिषद सभागृहात माहिती देताना दिली. 


एजंटच्या नादी लागू नये


कोणीही एजंटच्या नादी लागू नका, कोणी एजंट येत असेल तर तक्रार करा. अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला, त्याला निलंबित करण्यात आलं आहे, त्यास बडतर्फ करण्याचाही विचार सरकार करत आहे. दरम्यान, जेवढं जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करता येईल, तेवढं आपल्याला जलद गतीने काम करता येईल. त्यामुळे, महिला भगिनींनी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. तसेच, ऑनलाईनसाठी पोर्टलवर येणाऱ्या अडचणीही काढल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.  


योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा? 



  • योजनेच्या लाभासाठी पोर्टल/ मोबाईल अॅपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल. 

  • लाभार्थ्यांचं आधार कार्ड

  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला/मतदान ओळखपत्र किंवा रेशनकार्ड

  • बँक खातं पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी)

  • पासपोर्ट आकाराचा फोटो

  • रेशनकार्ड

  • सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र


हेही वाचा


CM Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरच्या घरी कसा भराल? फॉर्म झटपट डाऊनलोड करा