बीड : कोरोनाच्या संकट काळात राज्यातील ग्रामीण भागांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य खात्यातील परिचारिका या तुटपुंज्या वेतनावर ती काम करत आहे. अशातचं आता आरोग्य विभागामार्फत जी नवीन भरती केली जाणार आहे, या भरती प्रक्रियेला राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. आम्हाला आधी कायम सेवेत घ्या त्यानंतरच भरती करा असा पवित्रा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने घेतला आहे.
राज्यामध्ये 2005 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे काम सुरू झाले. या अंतर्गत राज्यभर कंत्राटी कर्मचारी म्हणून जवळपास एकोणीस हजार स्टाफ नर्स आणि एएनएम म्हणून काम करत आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था याच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामावर चालू आहे. मागच्या पंधरा वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ आठ ते दहा हजार रुपये प्रति महिना वेतन मिळत आहे. विशेषता कोरोनाच्या या संकटकाळात मागच्या तीन महिन्यापासून हेच कंत्राटी कर्मचारी आरोग्य व्यवस्थेमध्ये आपली जबाबदारी पेलताना पाहायला मिळत होते.
Corona India Update | देशात पहिल्यांदाच 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजारांपेक्षा जास्त वाढ
आरोग्य विभागाची परीक्षा देणे बंधनकारक
मात्र, आरोग्य विभागाकडून लवकरच मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे, अशी घोषणा झाल्यापासून या कर्मचाऱ्यांनी आम्हाला आधी कायम सेवेत घ्या त्यानंतरच भरती करा असा पवित्रा घेतला आहे. जर या भरती प्रक्रियेमध्ये हे कंत्राटी सेवेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम करायचं असेल तर त्यांना परीक्षा देणे बंधनकारक असेल अशी अटसुद्धा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी टाकल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याला या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवलाय. कारण मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून आरोग्य विभागात काम करत असताना अनेकांच्या वयोमर्यादा आता संपून गेलेली आहेत.
..तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही
अशा परिस्थितीमध्ये पुन्हा नोकरीसाठी परीक्षा देणे शक्य नाही. त्यामुळे नवीन भरती करण्याऐवजी आरोग्य विभागाने अगोदर आम्हाला सेवेमध्ये कायम करावं म्हणून या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 19 मे पासून आपल्या आंदोलनाला सुरुवात केली होती. 19 मे ते 26 मे पर्यंत काळ्या फिती लावून हे कर्मचारी कामावर होते. मात्र, 11 जून पासून राज्यभरातील जवळपास 19 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. यात आंदोलनामध्ये बीड मधील 35 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. जोपर्यंत आरोग्य विभागाकडून या संदर्भामध्ये निर्णय होत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
India Corona Update | देशात पहिल्यांदाच 24 तासात 14 हजारांहून अधिक कोरोनाबाधित