16th March In History : आज 16 मार्च हा दिवस क्रिकेट चाहत्यांसाठी खूप खास आहे. आजच्या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मिरपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 100 वे शतक झळकावले होते. सचिनने आशिया कप 2012 मध्ये एका सामन्यात 114 धावांची इनिंग खेळली होती. मात्र सचिनच्या ऐतिहासिक खेळीनंतरही भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. तमिम इक्बाल आणि शकिब अल हसन यांच्या शानदार खेळीच्या जोरावर बांगलादेशने टीम इंडियाचा 5 विकेट्सनी पराभव केला. सचिनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 51 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतके आहेत. लिटिल मास्टर म्हणून प्रसिद्ध असलेला सचिन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा एकमेव खेळाडू आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगचा नंबर लागतो, ज्याच्या नावावर 71 शतके आहेत. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे ज्याने 70 शतके झळकावली आहेत.


1910 : इफ्तिखार अली खान पतौडी यांची जयंती


आज 16 मार्च रोजी भारताचे माजी कसोटीपटू इफ्तिखार अली खान पतौडी यांची जयंती आहे. त्यांना पतौडीचे नवाबही म्हटले जायचे. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारताच्या वरिष्ठ संघांचे प्रतिनिधित्व करणारे ते भारतातील एकमेव क्रिकेटपटू होते. त्यांचा जन्म 16 मार्च 1910 रोजी पंजाबमधील पतौडी येथील एका राजघराण्यात झाला होता. त्यामुळेच त्यांना पतौडीचे नवाबही म्हटले जात होते. ते प्रसिद्ध क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी (टायगर पतौडी) यांचे वडील होते. 5 जानेवारी 1952 रोजी दिल्लीत पोलो खेळताना त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी ते 42 वर्षांचे होते.


1995 : राष्ट्रीय लसीकरण दिवस


16 मार्च हा राष्ट्रीय रोग प्रतिकारशक्ती दिवस म्हणूनही ओळखला जातो. भारतात 1995 पासून राष्ट्रीय लसीकरण दिवस सुरू झाला. यावर्षी 16 मार्च रोजी प्रथमच तोंडावाटे पोलिओची लस देण्यात आली. हा तो काळ होता जेव्हा देशात पोलिओचे रुग्ण झपाट्याने वाढत होते, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने पोलिओ लसीकरण सुरू केले होते.


देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 16 मार्च या तारखेला नोंदलेल्या इतर काही महत्त्वाच्या घटना : 


1527: खानवाच्या लढाईत बाबरने राणा संगाचा पराभव केला.


1693: इंदूरच्या होळकर घराण्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचा जन्म.


1846: पहिल्या अँग्लो-शीख युद्धाचा परिणाम म्हणून अमृतसरच्या तहावर स्वाक्षरी.


1901: स्वातंत्र्यसैनिक पी श्रीरामुलू यांचा जन्म.


1997: नवज्योत सिंग सिद्धूने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना आपल्या कसोटी कारकिर्दीतील एकमेव द्विशतक झळकावले. 673 मिनिटे फलंदाजी करताना त्याने 201 धावांची खेळी केली, जे त्यावेळी क्रिकेट इतिहासातील सर्वात संथ द्विशतक म्हणून नोंदवले गेले.


2000: पाकिस्तानातील लाहोरमधील एका न्यायालयाने जावेद इक्बालला फाशीची शिक्षा सुनावली. ज्याने पुरावा लपविण्यासाठी 6 ते 16 वयोगटातील मुलांची निर्घृण हत्या केली आणि त्यांच्या शरीराचे तुकडे केले. जावेद ज्या पद्धतीने लहान मुलांची हत्या करायचा त्याच पद्धतीने त्याला फाशी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते, मात्र शिक्षेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली.


2002: न्यूझीलंडच्या नॅथन अॅस्टलने इंग्लंडविरुद्ध खेळताना 163 चेंडूत द्विशतक झळकावून कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक ठोकले.