हरवलेला 'शाळेचा पहिला दिवस'!
आज १५ जून! कॅलेंडरवरची ही तारीख पाहिली की शाळेचा तो पहिला दिवस चटकन डोळ्यांसमोर उभा राहतो.

"काळ बदलत जातो पण आठवणी काही जात नाहीत,
आजही शाळा बघितली की डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही..."
आज १५ जून! कॅलेंडरवरची ही तारीख पाहिली की शाळेचा तो पहिला दिवस चटकन डोळ्यांसमोर उभा राहतो. आज ऑफिसला जात असताना लहान मुलांना स्कूल बसची वाट पाहताना पाहिलं आणि मनात आलं... का आपण एवढे मोठे झालो? पुन्हा एकदा तो युनिफॉर्म घालावा, पाठीवर दप्तर घ्यावं, वर्गातल्या त्याच लाकडी बाकावर जाऊन बसावं आणि शिक्षकांनी हजेरी घेताना मोठ्याने ‘बाई… हजर!’ असं म्हणावं... असं वाटून गेलं.
आज आपण मोठे झालोय. ऑफिसची डेडलाईन्स, घराची जबाबदारी आणि पैशांची गणितं मांडण्यात आयुष्य व्यग्र होत चाललंय. पण आजही, १५ जूनच्या सकाळी शाळेच्या दिशेने निघालेल्या त्या छोट्या पावलांना पाहताना मन नकळत २०-२५ वर्ष मागे गेलं आणि आठवला तो… “शाळेचा पहिला दिवस”. कधीकाळी आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा वाटणारा हा दिवस आज कॉर्पोरेटच्या यांत्रिक जगात फक्त एक 'सामान्य तारीख' बनून राहिलाय.
मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला की घरात एक वेगळीच लगबग असायची. रविवारी आई-बाबांचा हात धरून बाजारात केलेली ती खरेदी आठवतेय? जुनं दप्तर चांगलं असतानाही दरवर्षी बाबाकडे हट्टाने घेतलेली ती नवी बॅग, रेनकोट असतानाही आईकडून घेतलेली ती नवीन 'रंगीबेरंगी छत्री'... पायात पाणी जाऊ नये म्हणून बाबाने कौतुकाने घेतलेली ती ‘पावसाळी सँडल' आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन पुस्तकांवर खाकी कव्हर्स चढवणं! त्यावर पांढरी लेबलं लावून, बाबाच्या सुंदर हस्ताक्षरात स्वतःचं नाव आणि इयत्ता लिहिणं... तो नव्या कोऱ्या पुस्तकांचा सुवास म्हणजे जणू स्वर्गसुखच होतं. आज आपण स्वतःच्या पैशाने ब्रँडेड गोष्टी सेकंदात ऑनलाईन विकत घेतो, पण त्या शाळेच्या खरेदीत बाबाच्या खिशातून सुटणाऱ्या पैशांमध्ये जे प्रेम आणि कौतुक होतं, ते आज कुठल्याही क्रेडिट कार्डमध्ये नाही.
शाळेच्या पहिल्या दिवशी वर्गात पाऊल टाकताना छातीत होणारी धडधड काही वेगळीच असायची. वर्गात ती ‘नवी जागा’ पकडण्यासाठी केलेली बालिश धडपड... अशातच दोन महिने न भेटलेले ते जिवलग मित्र-मैत्रिणी अचानक समोर यायचे. "तू सुट्टीत गावाला गेला होतास का?" इथपासून सुरू झालेल्या गप्पा बाई वर्गात येईपर्यंत थांबायच्या नाहीत. पहिल्या दिवशी अभ्यास नसायचाच. बाई प्रत्येकाला सुट्टीतली गंमत विचारत आणि आपण अगदी कौतुकाने हात वर करून सांगायचो.
या सगळ्यात 'मधल्या सुट्टीची' ती दीर्घ घंटा वाजायची आणि वर्गात जणू आनंदाचा पूर यायचा. आईने सकाळी उठून घाईघाईने करून दिलेली ती साधी भाजी-पोळी, मित्र-मैत्रिणींसोबत फस्त केली जायची. प्रत्येकाच्या डब्यातला तो एक-एक घास खाताना जी चव लागायची, ती आज फाईव्ह स्टार हॉटेल्सच्या महागड्या डिशेसनाही नाही. सुट्टीनंतर गाण्यांच्या भेंड्या खेळत, "आता उद्यापासून खरंच अभ्यास करावा लागणार" या विचारात शाळेतून घराची वाट धरली जायची.
शाळेच्या पहिल्या-दुसऱ्या दिवशीच वर्गात सर्वात मोठा सोहळा असायचा, तो म्हणजे 'मॉनिटर' किंवा 'वर्गप्रतिनिधी'ची निवड! शिक्षकांनी वर्गाबाहेर गेल्यावर फळ्यावर बोलणाऱ्यांची नावं लिहिण्याचा तो अधिकार म्हणजे एखाद्या राजाच्या अधिकारापेक्षा कमी नसायचा. नावासमोर मारलेली फुल्ली, तरीही चालू असलेला मुलांचा कल्ला आणि शेजारच्या वर्गातल्या बाईंनी येऊन दिलेला तो दम... हे सगळं आठवलं की आजही चेहऱ्यावर हसू येतं.
अभ्यासात बऱ्यापैकी हुशार असल्यामुळे माझी गृहपाठाची वही नेहमी पूर्ण असायची. बाईंनी कौतुकाने पाठीवर दिलेली ती थाप आणि कधीतरी दंग्यासाठी सरांनी हातावर मारलेली ती प्रेमळ छडी... आजच्या सुपरफास्ट जगात 'ॲप्रिसिएशन' आणि 'टार्गेट्स'च्या मागे धावताना, त्या छडीतली आणि ओरडण्यातली खरी आपुलकी प्रकर्षाने आठवते.
चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि स्नेहसंमेलन अशा सर्व गोष्टींचा आपल्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. मी शाळेत असताना वर्गात पहिला क्रमांक कधी आला नाही, पण पहिली ते दहावी वक्तृत्व स्पर्धेत मात्र कायम पहिला क्रमांक पटकावला! अर्थात याचं श्रेय पूर्णपणे माझ्या बाबाला जातं… कारण तो माझ्याकडून भाषणाची संपूर्ण तयारी करून घेत असे. माझी शाळा खूप 'हायफाय' किंवा इंटरनॅशनल नव्हती, पण याच शाळेने आजपर्यंत विविध क्षेत्रातील नामवंत घडवले आहेत. माझा बाबा, आत्या आणि काकादेखील याच शाळेचे माजी विद्यार्थी! त्यामुळे या शाळेतला प्रत्येक कोपरा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे.
आज आपण आयुष्यात खूप पुढे आलोय खरे, पण कुठेतरी ते बालपण, तो निरागसपणा आणि तो १५ जूनचा निखळ आनंद मागे सुटलाय. पैशांच्या गणितात आपण जिंकलो असू, पण आठवणींच्या गणितात आजही आपण शाळेच्या पहिल्या दिवसापुढे शंभर टक्के हरतो. आज शाळा सुटून अनेक वर्ष झाली, तरी सुदर्शन सांबसकर यांच्या कवितेतल्या या ओळी मनाचा ठाव घेतात...
"ज्ञानाची तहान, बाई आमुच्या महान, पुन्हा तेच दिवस जगण्यासाठी, मन होऊ लागतं लहान नी लहान..."
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
Before You Go
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
महत्त्वाच्या बातम्या





















