यवतमाळ : यवतमाळमध्ये सिझेरीयनद्वारे प्रसुती झालेल्या महिलांना इन्फेक्शन झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार आहे. या इन्फेक्शमुळे गेल्या महिन्याभरापासून या महिलांना नवजात बाळांसह रुग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहेत. यादरम्यान डॉक्टरांकडून चांगली वागणूक दिली जात नसल्याचा आरोप महिलांच्या नातेवाईकांनी केला आहे.
VIDEO | सिझेरियनद्वारे प्रसुती झालेल्या 14 महिलांना इन्फेक्शन, शासकीय रुग्णालयातील प्रकार | यवतमाळ | ABP Majha
यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात सिझेरीयनद्वारे प्रसूत झालेल्या डझनावर महिलांना इन्फेक्शन झालं आहे. प्रसुती विभागात 21 एप्रिल रोजी सिझेरीयनद्वारे प्रसुती झालेल्या महिलांनी शस्त्रक्रियेच्या ठिकाणी प्रचंड दुखत असल्याची तक्रार केली. परंतु औषधांनी बरं वाटेल असं सांगत डॉक्टरांनी त्यांना अंधारात ठेवलं. महिनाभरापासून नेमके काय उपचार सुरु आहेत याबद्दल महिलांच्या नातेवाईकांनी चौकशी केल्यावर सगळा प्रकार समोर आला.
या रुग्णालयात प्रसुती झालेल्या 14 महिलांना अशाच प्रकारचे इन्फेक्शन झाल्याची माहिती आहे. रुग्णालयातील हलगर्जीपणा समोर आल्यानंतर माहिती घेण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना रुग्णालयात कॅमेरा घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला. शिवाय रुग्णाच्या नातेवाईकांसोबत बोलण्यासही मनाई करण्यात आली.
संपूर्ण प्रकारावर बोलतांना रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. संजय भारती यांनी सांगितलं की, इन्फेक्शन बाबतच्या तोंडी तक्रारी आम्हाला मिळाल्या आहेत. या तक्रारींवरुन 5 सदस्यीय इन्फेक्शन कंट्रोल कमिटीमार्फत चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढे अशा घटना घडणार नाहीत, यासाठी काळजी घेतली जाईल, असंही डॉ. भारती यांनी सांगितलं.
VIDEO | सिझेरियनद्वारे प्रसुती झालेल्या 14 महिलांना इन्फेक्शन, रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठातांची प्रतिक्रिया | यवतमाळ | ABP Majha