नाशिक : नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरातील वादग्रस्त जमीन खरेदी केल्यामुळे अडचणीत  सापडलेल्या सुरेश वाडकर यांना नाशिक पोलिसांनी दिलासा दिला आहे. जमिनीच्या वादात अडकल्याने 11 वर्ष  पद्मश्री पुरस्कार मिळायला उशीर झाला. दरम्यानच्या काळात सरकारी अधिकारी, मोठमोठे राजकीय नेते कोणीच मदत केली नाही, अधिकारी तर केवळ वेळकाढू पण करत असल्याची खंत सुरेश वाडकर यांनी व्यक्त केली. 


 भूमाफिया विरोधात नाशिक पोलिसांनी मोहिम उघडली असून जनजागृती भूमाफिया या लघुपटाची निर्मिती केली. त्याचा लोकार्पण सोहळा सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर यांच्यां उपस्थितीत पार पडला. यावेळी भूमाफियाचा मी स्वतः शिकार झालो होतो. लॅटिकेशनची जमीन मला विकण्यात आली. माझ्या एका मित्रानेच मला फसवले, वादग्रस्त जमिन खरेदी केल्या प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्याची किंमत मोजावी लागली, असे वाडकर म्हणाले.  


 वाडकर म्हणाले, राष्ट्पती भवनातून चौकशी झाली. गुन्हा दाखल असल्यानं तब्बल 11 वर्ष पद्मश्री पुरस्काराला मुकावे लागले. याकाळात आम्ही तुमचे मोठे फॅन आहोत असे म्हणणाऱ्या राजकीय नेत्यांनी देखील दिलासा दिला नाही. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, विनोद तावडे यांच्यासह मोठमोठ्या नेत्याकडे गेलो मात्र कोणी दिलासा दिला नाही. अधिकाऱ्यांनी तर फक्त वेळकाढूपणा केल्याचा आरोप वाडकर यांनी पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केला. नाशिकमध्ये संगीत  शाळा सुरू करणार असल्याचे देखील वाडकर या वेळी म्हणाले.


ओंकार स्वरुपा सदगुरु समर्था, तू सप्तसूर माझे, ऐ जिंदगी गले लगा ले, सपने में मिलती है, मेघा रे मेघा रे, चप्पा चप्पा चरखा चले यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडली आहे. 1981 मध्ये संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या क्रोधी चित्रपटात चल चमेली बाग में, तर प्यासा सावन चित्रपटात लता मंगेशकर यांच्यासह मेघा रे मेघा रे ही गाणी त्यांनी गायली.