10th June Headlines: आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. आजपासून वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची वर्षभर प्रतिक्षा असते तो दिवस आज आहे. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून पंढरपूरसाठी प्रस्थान होणार आहे. देहूमध्ये या निमित्ताने हजारो वारकरी एकत्र आले आहेत. तर, छत्रपती संभाजीनगरमधून मानाच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान होणार आहे. राजकीय क्षेत्रातही घडामोडी आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नांदेड दौऱ्यावर असून जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25 वा वर्धापन दिन आहे.
आषाढी वारी विशेष
- संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून आज प्रस्थान होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि स्थानिक खासदार-आमदार उपस्थित राहणार आहेत. पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे.
- छत्रपती संभाजीनगर - मानाच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान होईल. सकाळी 11 वाजता पालखी नाथांच्या जुन्या वाड्यातून समाधी मंदिराकडे जाईल आणि सूर्यास्ताच्या वेळी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. यावेळी गावकरी निरोप देण्यासाठी गर्दी करतात.
- शिर्डी - त्रंबकेश्वर येथून निघालेली निवृत्ती महाराज पालखी नगर जिल्ह्यात पोहचली असून ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात येत आहे. उद्या लोणी गावातून पालखीचा पुढचा प्रवास सुरु होईल.
- बुलढाणा - दरवर्षी आदिशक्ती संत मुक्ताईची पालखी पंढरपूरला जाताना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथे मुकामी असते. या गावात गेल्या तीनशे वर्षापासून पालखीतील वारकऱ्यांना पाहुणचार करण्याची अनोखी परंपरा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन...
- आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन.. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनासाठी आज शरद पवार दिल्लीत असणार आहेत. प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारणीतले इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, मुंबई आणि पुणे येथील कार्यालयात पक्षाचे झेंडावंदन होणार आहे.
नांदेड
- नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संध्याकाळी जाहीर सभा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला नांदेडमध्ये सभा घेणार आहेत. मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उपक्रमाअंतर्गत नांदेडमध्ये अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे.
मुंबई
- नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीबाबत या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत.
- सॅम डिसूजाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी. समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयनं दाखल केलेल्या कथित खंडणी वसुली प्रकरणात सॅम सहआरोपी आहे.
- खासदार संजय राऊत यांच्या विरोधात डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेली अब्रू नुकसानीच्या याचिकेवर शिवडी कोर्टात आज सुनावणी
- छगन भुजबळांनी येवला मतदारसंघातील 47 कोटी 50 लाखांच्या विकासकामांवरील स्थगिती उठविण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. सत्ता बदल होताच या कामांना स्थगिती देण्यात आली होती.
हिंगोली
- आज शहरात बंजारा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला संबोधित करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत.
नाशिक
- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आज नाशिक दौऱ्यावर असतील. सकाळी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. त्यानंतर भाजप कार्यलयात आढावा बैठक घेणार आहेत.
बुलढाणा
- राज्याचे राज्यपाल रमेशसिंह बैस आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे संत गजानन महाराज समाधी मंदिरात दर्शनासाठी येणार.
परभणी
- मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उद्या मतदान होणार आहे. तीन विविध पॅनल मध्ये ही निवडणूक होत आहे.