लातूर : मराठवड्यातील भीषण दुष्काळामुळे एकीकडे रेल्वेने पाणी देण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी मात्र बिनधास्तपणे पाण्याची उधळपट्टी करत आहेत. राज्याचे कृषीमंत्री एकनाथ खडसेंच्या लातूर दौऱ्यासाठी तब्बल 10 हजार लिटर पाण्याची नासाडी झाली आहे.


 

एकनाथ खडसेंचा आज लातूर दौरा आहे. लातूरनंतर औसा तालुक्याच्या बेलकूंड गावाला ते भेट देणार आहेत. मात्र, याच बेलकूंडमध्ये हेलिपॅड उभारणीसाठी 10 हजार लिटर पाण्याची फवारणी करण्याच आली.



खरंतर म्हणजे लातूर शहरापासून बेलकूंड हे गाव अवघं 40 किलोमीटर लांब आहे. मात्र, खडसेंनी वाहनानं प्रवास न करता 15 मिनिटांच्या या प्रवासासाठी हेलिकॉप्टरनेच जाणं पसंत केलं. परंतु खडसेंच्या या हवाई हौसेसाठी तब्बल 10 लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली. लातूरमध्ये भीषण पाणी टंचाई असल्याने सांगलीच्या मिरजमधून दररोज रेल्वेद्वारे 10 वॅगन पाणी पोहोचवलं जात आहे.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसासाठी दोन हजार लिटर पाणी वापल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. परंतु आता त्यांच्याच पक्षाचे नेते आणि मंत्री एकनाथ खडसे यांच्या फक्त हवाई हौसेसाठी 10 हजार लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली आहे.