Unseasonal Rain : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पूर्व विदर्भाला झोडपलं! बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात, तोंडचा घास हिरावला
Maharashtra Weather Update: ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला आहे.

Unseasonal Rain : ऐन उन्हाळ्यात नागपूरसह पूर्व विदर्भातील (East Vidarbha) अनेक भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावत एकच दाणादाण उडवली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून रब्बी पीक मातीमोल झाले आहे. मागील दोन दिवसात भंडारा जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. काल (11 एप्रिल) सायंकाळच्या सुमारास काही भागात पावसानं अक्षरशः थैमान घातलं. अर्धा तास पडलेल्या या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसात बागायती शेतकरी संकटात सापडले आहेत.
मागील काही दिवसांपासून टोमॅटोला दर मिळत नसल्यानं शेतकरी हतबल झालेले होते. आता लग्न समारंभाचा काळ सुरू झाल्यानं टोमॅटोला चांगले दर मिळायला सुरुवात झाली असतानाचं अवकाळी पावसानं आता शेतातील टोमॅटो पावसानं खराब झालेत. त्यामुळं शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट ओढवलय. वादळी पावसात आंबा ही गळून पडल्यानं आंबा उत्पादकांवर संकट ओढवलेलं आहे. लग्न समारंभासाठी अनेक ठिकाणी उभारण्यात आलेले पेंडॉल कालच्या वादळी वाऱ्यात उडाले तर, काही ठिकाणी फाटले असल्याची दिसून आले आहे.
वादळी वाऱ्यानं सौर ऊर्जेचे पॅनल उडालेत, शेतकऱ्यांचं मोठे आर्थिक नुकसान
बुधवार आणि गुरुवारला भंडारा जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. या वादळी वाऱ्यानं अनेक ठिकाणचे वृक्ष कोसळल्यानं विद्युत तारा तुटल्यात. मोहाडी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात तर काही नागरिकांनी त्यांच्या घरावर सौर ऊर्जेचे शेड उभारून त्यावर सौर पॅनल लावले होते. प्रचंड वाऱ्याच्या वेगानं हे सौर पॅनल तुटले आणि दूरवर जाऊन पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. सुदैवानं सोलर पॅनल उडून दूरवर पडत असताना कुठलीही जीवितहानी झाली नाही.
अकोल्यात उन्हाचा पारा वाढला, प्राण्यासाठी पाणवठ्याची सोय
दुसरीकडे, अकोला जिल्ह्याचा उन्हाचा पारा सातत्याने वाढतोय. एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा 44 अंशावर पोहचलाय. मात्र या वाढत्या उन्हामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाहीये. यासाठी काटेपूर्णा अभयारण्य तसेच कारंजा अभयारण्य येथे वन्यजीव विभागामार्फत वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी पाणवठ्याची सोय करण्यात आलीये. याचबरोबर काळवीटांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या कारंजा काळवीट अभयारण्यात 22 ठिकाणी पाणवठ्याची सोय करण्यात आलीये. काटेपूर्णा अभयारण्यात बिबट, अस्वल, चितळ, नीलगाय, कोल्हा या प्रमुख प्राण्यांसह विविध प्रजातीचे पक्षी या पाणवठ्यावर पाणी प्यायला येतायेत.. त्यामुळे आता वन्य प्राण्यांचा पाणी प्रश्न मिटलाय..
हे ही वाचा





















