Maharashtra Weather Update : राज्यातील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. एकीकडे शेतीच्या कामांची लगबग सुरु असून अनेकांनी शेतातील पेरणी हि आटोपली आहे. मात्र ऐनवेळी पावसाने पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट हि डोकावू लागले आहे. अशातच मराठवाड्यातील शेतकऱ्यासाठी एका दिलासादायक बाब पुढे आली आहे. काल (21 जुलै) रात्री दहा पासून पहाटेपर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली असून सध्या पावसाचा जोर कायम आहे. तब्बल एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून गायब असलेल्या पावसाची जोरदार हजेरी लागल्याने बळीराजा सुखावला आहे. लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची तुफान बॅटिंग सध्या सुरु आहे.
लातूर जिल्ह्यात तुफान बॅटिंग, सोयाबीन पिकासाठी वरदान
जवळपास एक महिन्यापासून लातूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. जिल्ह्यातील काहीच ठिकाणी पावसाची नाममात्र हजेरी होती. तर अनेक ठिकाणी पावसानं महिनाभर सुट्टी घेतली होती. अशातच काल संध्याकाळपासूनच लातूर शहर, लातूर ग्रामीण, औसा, किल्लारी, रेणापूर या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्री नऊ ते रात्री बारा या कालावधीत पावसाच्या मध्यम सरी बरसत होत्या. तर रात्री एक ते अडीच या कालावधीत पावसाचा जोर वाढला आणि पावसानं तुफान बॅटिंग करत महिन्याभराचा गॅप भरून काढण्याचा सपाटा लावला होता. हा पाऊस सोयाबीन पिकासाठी वरदान म्हणून आला असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.
परभणीत 5 दिवसांनंतर पावसाची हजेरी
परभणीत शहारासह लगतच्या परिसरात 5 दिवसांनंतर पावसाने हजेरी लावली आहे. अर्धा तास सर्वत्र जोरदार पाऊस-पावसाने उकाड्यापासून काहीसा दिलासा दिलाय, तर पिकांनाही अधिक बळ मिळाले आहे. परभणी जिल्ह्यात यंदा पावसाळ्याचे 2 महिने संपत आले तरी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे एकीकडे उकाडा वाढलाय तर दुसरीकडे पिके ही सुकी लागली आहे. त्यातच 5 दिवसांच्या खंडानंतर परभणीसह इतर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावलीय. सध्या सर्वत्र अर्धा तास जोरदार पाऊस बरसलाय. त्यामुळे भर पावसाळ्यात उकाड्याने त्रस्त झालेल्या परभणीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे, तर पिकांनाही बळ मिळाले आहे.
वाशिममध्ये दहा दिवसानंतर पावसाची हजेरी, शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत
वाशिमच्या कारंजा तालुक्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने पाठव फिरवली होती. अशातच काल तब्बल दहा दिवसानंतर कारंजाच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कोमजलेल्या पिकाला नव संजीवनी मिळाली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाशिम जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर कारंजा तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे काल पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या असून पिकालाही जीवनदान मिळाले आहे.
वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्यात पावसाची हजेरी
तब्बल वीस दिवसांच्या प्रतिक्षेनंतर नांदेड शहर आणि जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासुन पाऊस गायब झाला होता. तर अधून मधून हलका पाऊस झाला होता. मात्र पाऊस नसल्याने कोवळ्या पिकाना धोका निर्माण झाला होता. अशातच काल (21 जुलै) दुपारी चारच्या सुमारास मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामूळे पिकांना जीवदान मिळाले. तब्बल तासभर पाऊस सूरू होता. जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असुन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शिवाय हवामान खात्याने देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हे ही वाचा