Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह (Rains) राज्यभरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं अनेक जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढलं आहे. अशातच आज तिसऱ्या दिवसासाठी हवामान विभागाकडून (Meteorological Department) मुंबईतील पावसासंदर्भात एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. मुंबईसाठी आज देखील आॅरेंज अलर्ट कायम असताना मुंबईवरचा पाऊस आता उत्तर महाराष्ट्राकडे सरकणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

Continues below advertisement

उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

मुंबईत मागील 24 तासांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मात्र कमी दाबाचे क्षेत्र आता मध्यप्रदेशकडे सरकल्याने पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलीय. तर मुंबईत आज मोठा पाऊस होणार नसला तरी खबरदारी म्हणून हवामान खात्याकडून आॅरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. परिणामी यंत्रणांना सतर्क ठेवण्यासाठी हवामान विभागाकडून हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आज दुपारनंतर पावसाचा जोर ओसरणार असून पुढे उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.

कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?

नाशिक, पुणे, साताऱ्यातील घाट माथ्यावर आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

ठाण्यात खबरदारी म्हणून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पालघर, रायगड, रत्नागिरीसाठी आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

राज्यातील काही भागात 100 मिमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तर विदर्भात आज सर्वत्र विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रायगडच्या बाळगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; गावांना सतर्कतेचा इशारा

रायगडमध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा फटका पेण तालुक्याला सुद्धा बसलाय. पेणमधील बाळगंगा नदीने धोक्याची पातळी गाठल्याने येथील अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळत आहे. बाळगंगा नदीला पूर आल्यामुळे तालुक्यातील खरोशी गावात पुराचे पाणी शिरल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दुसरीकडे पालघरमध्ये आज ही अधून मधून पाऊस सुरू असून जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाची पाणी पातळी 118.60 मीटर पर्यंत पोचली असून हे धरण 100% भरला त्यामुळे धरणाचे पाचही दरवाजे 50 सेंटिमीटरने उघडण्यात आले असून धामणी आणि कवडास या दोन्ही धरणा मिळून 8475 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या सूर्या नदीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर असून नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

आणखी वाचा