Weather Update : राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस (Rain) पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वीच राज्यात काही ठिकाणी (Maharashtra Weather Update) विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पावसाने हजेरी लावत एकच दाणादाण उडवली आहे.  या पावसाचा फटका आता शेतकरी (Farmer) बांधवांनी बसला असून शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे. विशेषत: विदर्भात पावसाचा कहर बघायला मिळाला असून  यवतमाळ अमरावतीसह वाशिम जिल्ह्याला पावसाने काल (11 जून) अक्षरक्ष: झोडपलं आहे. वादळी वाऱ्याचा एकट्या यवतमाळ  जिल्ह्याच्या 9 तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. यात तब्बल 1815 घरांचे नुकसान झाले असून 57 जनावरांचा मृत्यू झाला आहे. परिणामी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सर्वत्र पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

Continues below advertisement


यवतमाळ जिल्ह्याच्या 9 तालुक्यांना मोठा फटका


यवतमाळ जिल्ह्यात  झालेल्या वादळी पावसामुळे यवतमाळ, आर्णी, पुसद, दिग्रस, महागाव, घाटंजी, कळंब, वणी, नेर या  9 तालुक्यात नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. या तालुक्यात 1815 घरांची आणि  गोठ्यांची पडझड झाली. एकाच मृत्यू तर 4 गंभीर जखमी झाले.  57 जनावरांच्या मृत्यू झालाय, तर 162 हेक्टर वरील केळी, संत्रा, लिंबू, पपई, तीळ, ज्वारी फळबाग इतर पिकांचे नुकसान झाले. अनेकांच्या घरांवरील टीनपत्रे उडून गेली. काही ठिकाणी विद्युत पोल देखील खाली पडले. त्यामुळे खंडित झालेला वीज पुरवठा उशिरापर्यंत सुरळीत झाला नाही. परिणामी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे, अशे निर्देश दिले.


1795 घरांची पडझड, 57 जनावरांचा मृत्यू


- 8 तालुक्यातील 21 गावांना फटका
- 1795 घरांची पडझड
- 10 घरांची पूर्णतः पडझड
- 10 गोठयांची पडझड
- एकाच मृत्यू, 4 गंभीर जखमी
- 57 जनावरांचा मृत्यू
- 162 हेक्टर वरीक पिकांचे नुकसान


दर्यापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस


अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये काल(11 जून) बुधवार रोजी दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळीवारासह मुसळधार पाऊस झाला. नांदरुण या भागामध्ये अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये पाणी साचलेले होते. तर रामतीर्थ येथे वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली आणि अनेकांच्या घराचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता करण्यात येत आहे.


वाशिम जिल्ह्यात काल(11 जून) सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदारपणे पाऊस बरसल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याच पाहायला मिळालं. यात अनेकांच्या घरावरील छत टिनपत्रे वादळी वाऱ्याने उडाल्याने नागरिकांना उघड्यावर झोपण्याची वेळ आली. तर अनेकांच्या जीवन उपयोगी साहित्य भिजल्याचं पाहायला मिळालं. यात रिसोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 


मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक कडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी


पुसद तालुक्यातील गहुली, बांशी, मुंगशी, वनवारला,  या भागाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने चांगलेच झोडून काढले. जवळपास एक तास झालेल्या वादळाने या परिसरातील केळीचे पिक जमीनदोस्त झाले. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकला गेला. या नुकसानाची माहिती मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना  होताच त्यां नुकसान ग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर पोहचल्या त्यांनी या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्याशी संवाद साधत शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिल्याचे शेतकऱ्यांना सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या