Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार (IMD) महाराष्ट्रतील बहुतांश भागाला मान्सूनपूर्व पावसाने (Pre-monsoon Rains) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. तर काल, मंगळवारी संध्याकाळपासून मंगळवार मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. तर पुण्यातील काही रस्त्यांना अगदी नदीचं स्वरुप आल्याचं दिसून आलं. अचानक आलेल्या आणि काही तासांच्या या पावसानं सर्वत्र एकच दाणादाण उडवून दिली. तर या पावसाने शेतकऱ्यांचे ही मोठं नुकसान केलं आहे. तर दुसरीकडे वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे मच्छीमारांना मत्स्यविभागाकडून सूचना जारी करण्यात आल्या असून 1 जून ते 31 जुलैपर्यंत दोन महिने मासेमारी बंद राहणार असल्याचे बोलले जात आहे.
वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे मच्छीमारांना मत्स्यविभागाच्या सूचना
येणाऱ्या काही दिवसात वादळी वारे आणि अति मुसळधार पाऊस लक्षात घेता खोल समुद्रात मच्छिमार करणाऱ्या मच्छीमारांना आता आपल्या बोटी किनाऱ्यावर दाखल करण्याच्या सूचना मत्स्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हळूहळू या बोटी किनाऱ्यावर दाखल होत आहेत. दरम्यान, 1 जून ते 31 जुलैपर्यंत ही मासेमारी बंद राहणार असल्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाकडून आले आहेत. या कालावधीत मासेमारी करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मत्स्य विभागाकडून देण्यात आला आहे. यामध्ये यंत्रचलित आणि यांत्रिक मासेमारी ही बंद राहणार आहे.
येत्या चार दिवसात मुसळधार पावसाची शक्यता
अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असल्यानं त्याचा प्रभाव मुंबईसह महाराष्ट्रात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रावर दिसणार आहे. त्यामुळं येत्या 22 मे ते 24 मे या कालावधीत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू
राज्यातील इतर भागाप्रमाणेच विदर्भातही दमदार पावसाने हजेरी लावलीय. अशातच भंडारा जिल्ह्यात काल विजांच्या कडकडाटासह आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसात तीन पाळीव जनावरांचा मृत्यू झालाय. लाखांदूर तालुक्यातील दोन, तर लाखनी तालुक्यातील एका पशुपालकाचे यात नुकसान झालं. पशुपालकांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.
कापणीला आलेलं भातपीक भुईसपाट, शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात
कर्ज घेऊन भातपिकाची लागवड केली. कापणीला आलेल्या भातपिकाची येत्या चार दिवसात कापणी करून शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायचं, असं स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांचं स्वप्न वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं भंग केलं. भंडारा जिल्ह्यात काल वळवाच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. याचा सर्वाधिक फटका बसलाय तो पवनी तालुक्यातील पहेला परिसरातील शेती पिकाला. वादळी वाऱ्यानं कापणीला आलेलं शेकडो हेक्टरमधील भातपीक अक्षरश: भुईसपाट झालं.
हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस, इसापूर-रमना गावाच्या ओढ्याला पूर
हिंगोली जिल्ह्यांमध्ये मंगळवारच्या संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरुपाचा पाऊस झालेला आहे. जिल्ह्यातील ईसापुर-रमणा अंभेरी गावाच्या शिवारामध्ये एक तास ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे. जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे इसापूर रमणा गावाच्या जवळ असलेल्या ओढ्याला पूर आला आहे. दरम्यान पुराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक रात्री काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान या जोरदार पावसामुळे हवेत कमालीचा गारवा पसरला आहे.
हे ही वाचा