Maharashtra Heavy Rain : विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, मन्याड नदीला पूर आला आहे. लिंबोटी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं त्याचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. नायगाव परिसरात पाणी भरले असून, शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. कंधार, नायगाव, बिलोली, देगलूर, धर्माबादमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून, नांदेडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणाचा संपर्क तुटला आहे. कहाळा गाव पूर्ण पाण्याखाली गेले आहे.
लातूर जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारी दिवसभर कायम राहिला. मध्यरात्रीनंतरही पावसाचा जोर कायम होता. या पावसाने शेतीसह जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंतिम टप्प्यात आलेले शेती पीक या पावसाने अक्षरशः मातीमोल करून टाकले आहे. शेतात सर्वत्र पाणीच पाणी असल्याने पिके आता सडायला लागली आहेत. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अरुंद छोटे आणि कमी उंचीच्या पुलावरून पाणी जात असल्याने हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. दरम्यान या पावसाचा फटका जिल्ह्याभरात 42 ठिकाणी पाहायला मिळाला असून पावसामुळे सर्वत्र हाहाकार झाल्याचे चित्र आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 62.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जळकोट तालुक्यात सर्वाधिक 77.7 मिमी, तर उदगीरमध्ये सर्वात कमी 50 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 62.8 मिमी पावसाची नोंद
लातूर – 60 मिमी
औसा – 57.3 मिमी
अहमदपूर – 62.9 मिमी
निलंगा – 50 मिमी
चाकूर – 51.7 मिमी
रेणापूर – 64.9 मिमी
देवणी – 59.2 मिमी
शिरूर अनंतपाळ – 72.7 मिमी
जळकोट – 77.7 मिमी
पावसाचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत
दुसरीकडे जिल्ह्यातील 41 ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. ग्रामीण भागात अनेक घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झालं आहे. शेतीपिकांचे अंतिम टप्प्यात मोठे नुकसान झालं असून हे न भरून निघणारे आर्थिक संकट शेतकऱ्याला सहन करावे लागणार आहे. दुसरीकडे पावसाचा कहर लक्ष्यात घेता प्रशासन देखील सज्ज झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे अधिकारी-कर्मचारी फिल्डवर तैनात झाले असून आपत्कालीन उपाययोजना सुरू आहेत. याशिवाय, 29 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे.
पुरात वाहून गेला, झाडाला अडकला म्हणून जीव वाचला
अहमदपूर तालुक्यातील माकणी येथे मोठी दुर्घटना टळली आहे. काल (28 ऑगस्ट) संध्याकाळच्या वेळेला नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात शेतकरी दौलतराव डोंगरगावे (रा. माकणी) वाहून गेले. सुदैवाने, काही अंतरावर पुढे वाहत गेल्यानंतर ते एका झाडाला अडकले आणि त्यांचा जीव वाचला. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिकांनी तातडीने धाव घेऊन त्यांना मदत केली. सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील नद्या-नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दुसरीकडे विदर्भातील अकोला शहरातल्या उमरी भागात पावसाने हाहाकार उडालाय. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील नाल्याचे पाणी उमरीत शिरलंय. यामूळे रस्त्याला अक्षरश: तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. मोठी उमरीतील विठ्ठलनगर भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी घूसलेय. अनेक घरात नागरिक अडकले आहेय. विठ्ठल नगर भागातल्या पाण्याने वेढलेल्या एका घरातून घरातील तीन नागरिकांना लोकांकडून रेस्क्यू करण्यात आलेय. मात्र उमरीत पावसाने हाहाकार उडाला असतांना प्रशासनाचं कुणीच पोहोचलेलं नव्हतंय. पाणी वाढत असल्याने परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहेय. नागरिकांनी यासंदर्भात प्रशासन आणि विद्यापीठाकडे या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केल्यानंतरही दुर्लक्ष केल्याचा आरोप लोकांनी केलाय.
गुडधी गावात ढगफुटी सदृश्य पाऊस, अनेकांचे संसार उघड्यावर
अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दीड तासात अकोला शहरासह ग्रामीण मुसळधार पावसासह विजेंचा कडकटाट पाहायला मिळालाये. अकोला शहरा लागत असलेल्या गूडधी भागात देखील अनेकांच्या घरात पाणी शिरले. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नाल्याला आलेल्या पुरामुळे गुडधी ग्रामस्थांचे प्रचंड हाल झाले. अनेकांच्या घरात या नाल्याच्या पुराचे पाणी शिरलंय. अनेकांचे संसार उपयोगी साहित्य पूर्णतः पाण्याखाली खाली गेले.. स्वयंपाक घरापासून ते बेडरूम हॉलमध्ये गुडघ्यावर इतकं पाणी आहे.. तर काही घरांमध्ये कमरी इतकं पाणी साचलेय.. ग्रामस्थ घरातून पाणी काढण्याचा प्रयत्न करतात मात्र नाल्याचा पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे इथल्या ग्रामस्थांचे हाल होताना दिसत आहे.