Maharashtra Rain : गेल्या आठवड्याभरापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावल्याचे पाहायला मिळालंय. मे महिन्याच्या अखेरीस पावसाने सर्वत्र एकच धुमाकूळ घातला आहे. अशातच मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये गेल्या चोवीस तासांत दमदार पाऊस झाला. संभाजीनगर, जालना, नांदेड, जिल्ह्यांतील तब्बल 34 महसूल मंडळांतर्गत असलेल्या सुमारे 680 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. या गावांमध्ये 65 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. यातील १७ महसूल मंडळे जालना जिल्ह्यातील आहेत.
तर दुसरीकडे बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण मध्यरात्री झालेल्या पावसाने ओव्हरफ्लो झाले आहे. पहिल्यांदाच मे महिन्यात हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागात असलेले वांगनदीवरील महींद धरण सलग आठ दिवस झालेल्या पावसामुळे मे महिन्यातच ओव्हर फ्लो झाले आहे. एकुणात महाराष्ट्रातील अनेक लाहान मोठ्या धरणांची हीच परिस्थिती बघायला मिळत आहे.
मराठवाड्यातील 680 गावांमध्ये अतिवृष्टी
मराठवाड्यात गेल्या 6 मेपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. 27 ते 28 मे सकाळी 8 वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत आठही जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसला. विभागात सरासरी 23.6 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 44 मिमी पाऊस जालना जिल्ह्यात पडला. नांदेड जिल्ह्यात 30 मिमी, बीड जिल्ह्यात 26 मिमी, हिंगोली जिल्ह्यात 26 मिमी परभणी आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी 22 मिमी आणि धाराशिव जिल्ह्यात 10 मिमी पाऊस झाला. परिणामी मराठवाड्यातील 680 गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती समोर आली असून गेल्या 4 तासांत धुवाधार पाऊस बरसला आहे.
बीडचे बिंदुसरा धरण मे महिन्यातच ओवर फ्लो
बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण मध्यरात्री झालेल्या पावसाने ओव्हरफ्लो झाले आहे. पहिल्यांदाच मे महिन्यात हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे. धरणाच्या दोन्ही सांडव्यावरून बिंदुसरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर काही तरुण सेल्फीसाठी अनाठाई धाडस करताना दिसून येतायत. दरम्यान बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे बीड शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागला.
पाटण तालुक्यातील महिंद धरण ओव्हर फ्लो, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागात असलेले वांगनदीवरील महींद धरण सलग आठ दिवस झालेल्या पावसामुळे मे महिन्यातच ओव्हर फ्लो झाले आहे. धरण तुडूंब भरले असून धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. पावसाळ्याच्या पहिल्याच टप्प्यात धरण भरल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिंद धरणाचा 85 दशलक्ष घनफुट क्षमतेचे पाणलोट क्षेत्र असुन 35.98 चौरस किलोमीटर लांब आहे. या धरणाचे 362 हेक्टरचे लाभक्षेत्र आहे.
हे ही वाचा