Sanjay Raut: महाविकास आघाडीच्यावतीने (Mahavikas Aaghadi) आयोजित करण्यात येत असलेल्या मोर्चाला पोलिसांनी घातलेल्या अटींवर शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे. महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांविरोधात मोर्चा काढला जात असताना आमच्यावरच अटी लादल्या जात आहे. भाषणात अमुक शब्द वापरू नये, असे बंधन घालण्यात आले आहे. या अटींपेक्षाच या सरकारने आम्हाला भाषण लिहून द्यायचे होते, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला. आज होणारा मोर्चा हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


 महाविकास आघाडीच्यावतीने आज मुंबईत महामोर्चा (Morcha) काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी निघण्यापूर्वी संजय राऊत यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. 


राऊत यांनी म्हटले की,  महाराष्ट्रप्रेमींचा आज मोठा मोर्चा निघणार आहे. त्यापूर्वीच सरकारचे पाय लटपटले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांचा अपमान महाराष्ट्रात सुरू आहे. या अपमानाला विरोध करणाऱ्यांची अडवणूक सरकारकडून सुरू असल्याची टीका त्यांनी केली. मोर्चाला परवानगी देताना विविध अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, भाषणांबाबतही अटी घातल्या आहेत. त्यावर राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारने थेट भाषणच लिहून द्यायला हवी असे त्यांनी म्हटले. या सरकारमधील नेत्यांना भाषण लिहूनच दिली जात असल्याचा टोला त्यांनी लगावला. 


राज्य सरकारवर टीका 


संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारमधील काही मंत्र्यांमध्ये महाराष्ट्र प्रेमा अंश शिल्लक असेल तर त्यांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले. सत्तेत  असणाऱ्या लोकांमधील महाराष्ट्रप्रेमी हे खोक्याच्या वजना खाली दबले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. 


मुख्यमंत्री शहर बंद करतात आणि गृहमंत्री...


आज हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारेल्या ठाणे बंदवर संजय राऊत यांनी टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या ठाणे शहरातील आहेत, ते शहर स्वत: बंद करतात. मुख्यमंत्रीच शहर बंद करण्याचे आदेश देतात आणि गृहमंत्री थंड बसले आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. विचारांचा प्रतिवाद विचाराने करा असे सांगताना काही संघटनांनाचा कशाला वापर करता, असा सवालही त्यांनी केला. छत्रपती शिवरायांचा, डॉ. बाबासाहेबांचा अपमान झाला, यावर महाराष्ट्र बंद करायला हवा होता. मुख्यमंत्र्यांचा प्रभाव फक्त ठाणे-पाचपाखडीमध्येच आहे. त्यांचा प्रभाव इतर ठिकाणी नाही. मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्र प्रेमाचा अंश असेल तर ते मोर्चात सहभागी होतील असेही त्यांनी म्हटले.


राऊत यांना निळा फेटा बांधला


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कथित अपमान केल्याबद्दल संजय राऊत यांच्याविरोधात भाजप आक्रमक होत असताना दुसरीकडे आज आंबेडकरवादी संघटनेकडून राऊत यांना निळा फेटा बांधण्यात आला. भारतीय जय हिंद संघटनेकडून हा फेटा बांधण्यात आला.


इतर महत्त्वाच्या बातम्या: