Maharashtra weather Update : गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे राज्यभरातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. अनेक धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणातून नदीपात्रात 18 हजारावरून 22 हजार क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपत्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. नदीपत्रातील रस्ते बॅरिगेटिंग लावून बंद करण्यात आले आहेत. नागरिकांना नदीपत्रातील रस्त्याजवळ येऊ दिलं जात नाही आहे. सोबतच ढोल ताशा पथकाच्या सराव मंडप देखील पाण्यात गेलाय. दुसरीकडे उजनी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग पुन्हा वाढवला आहे. उजनी धरण सध्या 97% पेक्षा जास्त भरल्याने आता उजनी धरणातून तब्बल 61 हजार 600 क्युसेक विसर्गाने भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. तर वीर धरणातून 23000 क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, नदीकाठच्या ग्रामस्थांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

राज्यभरातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ

पुढे आलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील नीरा देवघर धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनी आणि विहिर धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे, ज्यामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. साताऱ्याच्या वाई येथील धूम धरणातून पाणी सोडल्याने वाईच्या प्रसिद्ध महागणपती मंदिरात पाणी शिरले. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाचे एकोणीस दरवाजे एक मीटरने तर चौदा दरवाजे अर्धा मीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने धरणातून विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात भुसे धरणातील पाणीपातळी वाढल्याने पर्यटकांना पाण्यात जाण्यापासून रोखण्यात आले. नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले, यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच हे धरण शंभर टक्के भरले. अहिल्यानगरच्या अकोल्यातील निळवंडे धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 6 घरांचे पूर्णता तर 364 घरांच अंशतः नुकसान

गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. यात गोंदिया जिल्ह्यात 6 घरांचे पूर्णतः तर 364 घरांची अंशतः नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे जनावरांच्या 135 गोठ्यांचे नुकसान झाले असून घर पडल्याने सालेकसा तालुक्यातील कवडी येथे एक महिला गंभीररीत्या जखमी झाली तर धान पिकाची हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे देखील यात प्रचंड नुकसान झाले आहे.

आणखी वाचा

Mumbai Crime news: मुंबईतील बड्या सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने आयुष्य संपवलं, हुंड्यावरुन सासूचे टोमणे असह्य झाले अन्...