Madha Crime News : मला उद्योग करण्यासाठी भांडवल द्या, म्हणून मुख्याध्यापक वडिलांना शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या मुलाच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी अखेर टोकाचे पाऊल उचललंय. यात मुख्याध्यापक वडिलांनी स्वत:ला रेल्वेखाली झोकून देत आपलं आयुष्य संपवलंय. रेल्वे खाली येऊन आत्महत्या केल्याचा हा धक्कादायक प्रकार माढा (Madha) तालुक्यातून समोर आला आहे. तर आत्महत्या केलेले मुख्याध्यापक हे माढ्याचे माजी आमदार विनायकराव पाटील यांचे पुतणे असल्याची माहिती समोर आली आहे. 

स्वत:ला रेल्वेखाली झोकून देत आयुष्य संपवलं!

पुढे आलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब पितांबर पाटील असं आत्महत्या केलेल्या त्या मुख्याध्यापक पित्याचे नाव असून मुलाच्या रोज होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पाटील यांनी पंढरपूर-कुर्डूवाडी रेल्वे मार्गावर लऊळ येथे रेल्वेखाली जीव दिला. यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलगा सौरभ पाटील यांच्याविरुद्ध कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सौरभ याला वैद्यकीय शिक्षणासाठी लाखो रुपये खर्चून वडील बाळासाहेब पाटील यांनी कर्नाटक येथे पाठवले होते. 

वडिलांना वारंवार शिवीगाळ आणि मारहाण

मात्र तेही शिक्षण अर्धवट सोडून सौरभ घरी परतला होता. आपल्याला उद्योगधंदे करण्यासाठी पैसे द्यावेत म्हणून सौरभ हा वडिलांना वारंवार शिवीगाळ व मारहाण करीत होता. याप्रकरणी निखिल पाटील यांनी सौरभ विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने सौरभ याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता, त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. या संपूर्ण घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोटाचा पोरगाच वडिलांच्या मृत्यूचे कारण ठरल्याने सर्वस्थरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

माझी पत्नी आणून द्या, माथेफीरूची पोलीस प्रशासनाकडे मागणी

संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावात प्रकाश पिंजरकर नावाच्या इसमाचे त्याच्या पत्नीशी भांडण झाल्याने जवळपास पंधरा वर्षांपूर्वी पत्नी त्याला सोडून माहेरी गेली आहे. अनेकदा त्याने पोलिसात निवेदनही दिलेत. मात्र  प्रकाश पिंजरकर यांनी चक्क शेगाव वानखेडे या बसच्या मागच्या काचा फोडल्या व पोलीस प्रशासनाने माझी पत्नी आणून द्यावी, अशी मागणी केली. सध्या ही बस वानखेड गावात थांबली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या