बीड : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनापूर्वीच काल (25 ऑगस्ट) बीडच्या गेवराईमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित समर्थकांत राडा झाला होता. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी आज मध्यरात्रीपासूनच बीड जिल्ह्यात पुढील पंधरा दिवस जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. पुढील पंधरा दिवस कुठलेही आंदोलन निदर्शने होणार नाहीत. एवढेच नाही तर पाच पेक्षा अधिक जमाव एकत्रित येण्यास देखील मज्जाव घालण्यात आला आहे. या दरम्यान प्रतिबंधात्मक कारवाई झुगारण्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील पोलीस प्रशासनाने दिला आहे.
लक्ष्मण हाकेंसह दोन्ही गटातील 14 जणांवर गुन्हा दाखल
बीडच्या गेवराई शहरात दोन गटांमध्ये झालेल्या राडा प्रकरणाने खळबळ उडालीय. या प्रकरणी लक्ष्मण हाके यांच्यासह तब्बल 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटातील समर्थकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून गेवराई पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. गेवराई शहरात काल (25 ऑगस्ट) दोन गट आमने-सामने आले. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी पूर्वीच लक्ष्मण हाके यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतरही हाके गेवराईत उपस्थित राहिल्याने दोन्ही गटातील वाद वाढला आणि वातावरण तणावपूर्ण बनले.
शिस्त राखण्याचे प्रशासनाचे आवाहन
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन्ही गटातील समर्थकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत गोंधळ घातल्याने कायदा-सुव्यवस्था बिघडली होती. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही गटांवरही कारवाई केली आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. गेवराईतील या राडा प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने शिस्त राखण्याचे आवाहन केले आहे.
विजयसिंह पंडित काय म्हणाले?
लक्ष्मण हाके हे समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचं कुटील कारस्थान बीड जिल्ह्यात येऊन सुरु आहे. तीन चार दिवसांपूर्वी खालच्या पातळीवर जाऊन माझ्या विरोधात प्रतिक्रिया दिली. ती प्रतिक्रिया दिल्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही. चिथावणीखोर वक्तव्यांना आमच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आहे, असं विजयसिंह पंडित म्हणाले. जरांगेनंना समर्थन दिल्यानं समाजासमाजात तेढ निर्माण होण्याचा काय प्रश्न असं विजयसिंह पंडित म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या