लातूर : सामान्यत: डॉ. जे. एम. वाघमारे यांची ओळख ‘लातूर पॅटर्न’चे जनक, शिक्षणतज्ज्ञ किंवा “जेएम विरुद्ध सीएम” या गाजलेल्या राजकीय लढतीतून होते. मात्र या दोन ओळखींच्या पलीकडे गेले, तर एक अत्यंत समृद्ध, गंभीर आणि वैचारिक साहित्यिक व्यक्तिमत्त्व दिसते ते म्हणजे साहित्यिक जेएम. शिक्षणातील प्रयोग, राजकारणातील संघर्ष आणि समाजकारणातील हस्तक्षेप करत असतानाच त्यांनी सातत्याने लेखणी चालू ठेवली. त्यांच्या लेखनात अनुभवांचे प्रामाणिक प्रतिबिंब आहे, अभ्यासाची खोली आहे आणि परिवर्तनाची तळमळ आहे.
अनुभवातून जन्मलेले लेखन
कौठा, जानवळसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या, दुष्काळ, दारिद्र्य आणि संघर्ष अनुभवलेल्या डॉ. वाघमारे यांचे लेखन हे पुस्तकांतून मिळवलेल्या ज्ञानापुरते मर्यादित नव्हते. शेती, कष्ट, उपेक्षा, शिक्षणासाठीची धडपड, बहुजन समाजाचे प्रश्न—हे सर्व त्यांच्या लेखनाचे मूळ स्रोत होते. त्यामुळेच त्यांच्या साहित्यात कृत्रिमता नसून अनुभवाची धार आहे.
निग्रो साहित्यापासून समाजपरिवर्तनापर्यंत
निग्रो साहित्य आणि पाश्चिमात्य विचारधारा हा त्यांच्या अभ्यासाचा विशेष विषय. The Quest for Black Identity, American Negro : Literature and Culture यांसारख्या ग्रंथांतून त्यांनी वंश, शोषण, अस्मिता आणि संघर्ष या जागतिक प्रश्नांकडे भारतीय समाजाच्या संदर्भात पाहण्याची दृष्टी दिली.त्याचबरोबर समाज परिवर्तनाच्या दिशा, परिवर्तन : संकल्पना, वेध आणि वास्तव, महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण या पुस्तकांतून त्यांनी मराठी समाजजीवनातील विसंगती, सत्ताकेंद्रे आणि परिवर्तनाच्या शक्यता स्पष्टपणे मांडल्या.
शिक्षणविषयक लेखन : विचार आणि वास्तव
डॉ. वाघमारे हे केवळ शिक्षण व्यवस्थापक नव्हते, तर शिक्षणाचे तत्त्वचिंतक होते.शिक्षण : समाज परिवर्तन आणि राष्ट्रीय विकास, आजचे शिक्षण : स्वप्न आणि वास्तव, प्राथमिक शिक्षण : यशापयश आणि भवितव्य या ग्रंथांतून त्यांनी शिक्षण व्यवस्थेचे वस्तुनिष्ठ विश्लेषण केले.शिक्षण ही केवळ नोकरीची वाट नसून सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे, ही भूमिका त्यांच्या लेखनातून सातत्याने पुढे येते.
आत्मकथन आणि व्यक्तिचित्रण
मूठभर माती हे आत्मचरित्र म्हणजे केवळ वैयक्तिक जीवनकथा नाही; तो मराठवाड्याच्या सामाजिक इतिहासाचा दस्तऐवज आहे.त्याचप्रमाणे जीवनरेखा, व्यक्तिवलये, संवाद या पुस्तकांतून त्यांनी समकालीन व्यक्तिमत्त्वांचे, विचारप्रवाहांचे आणि चळवळींचे संवेदनशील चित्रण केले.
कथनात्मक लेखन : गाव, माणूस आणि व्यवस्था
बखर एका खेड्याची ही कादंबरी ग्रामीण जीवनातील संघर्ष, राजकारण आणि व्यवस्थेचे वास्तव उघड करते. हे लेखन कल्पनेपेक्षा अनुभवाच्या अधिक जवळ जाणारे आहे.ज्ञान–विज्ञानाच्या देशात या प्रवासवर्णनात जागतिक अनुभवांचे सामाजिक भानाशी केलेले संधान दिसते.
सत्तेला भिडलेली लेखणी
राजकारणात थेट उतरून, 2002 मध्ये सत्ताधारी व्यवस्थेला आव्हान देणारे डॉ. वाघमारे हे जसे “जेएम विरुद्ध सीएम” या लढतीचे प्रतीक ठरले, तसेच त्यांच्या लेखनातूनही सत्ताकेंद्रांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.त्यांची लेखणी सत्तेसमोर नमली नाही, मग ती सत्ता शिक्षणातली असो, राजकारणातली असो किंवा समाज व्यवस्थेतील असो. डॉ. जनार्दन वाघमारे हे शिक्षणतज्ज्ञ, राजकीय व्यक्तिमत्त्व आणि समाजसुधारक तर होतेच; पण त्याहीपेक्षा ते एक सखोल, अभ्यासू आणि परिवर्तनवादी साहित्यिक होते.त्यांचे साहित्य म्हणजे अनुभव, विचार आणि संघर्ष यांचे एकत्रित चिंतन आहे. साहित्यिक जे. एम. ही ओळख त्यांच्या उर्वरित सर्व ओळखीइतकीच महत्त्वाची आणि दीर्घकाळ टिकणारी आहे.
डॉ. जनार्दन वाघमारे यांची ग्रंथसंपदा
* अमेरिकन निग्रो : साहित्य आणि संस्कृती* महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण* हाक आणि आक्रोश* शिक्षण : समाज परिवर्तन आणि राष्ट्रीय विकास* प्राथमिक शिक्षण : यशापयश आणि भवितव्य
* साहित्यचिंतन
* आजचे शिक्षण : स्वप्न आणि वास्तव* समाज परिवर्तनाच्या दिशा* समाज परिवर्तन की दिशाएँ (अनुवादित)* चिंतन एका कुलगुरुचे
* जीवनरेखा (व्यक्तीचित्रे)* The Quest for Black Identity* एक शिक्षाविद् का चिंतन (अनुवादित)* परिवर्तन : संकल्पना, वेध आणि वास्तव (गौरवग्रंथ)* चिंतनयात्रा* ज्ञान-विज्ञानाच्या देशात (प्रवास वर्णन)
* व्यक्तिवलये (व्यक्तीरेखा)
* बखर एका खेड्याची (कादंबरी)* The Horizons and Beyond
* संवाद
* मूठभर माती (आत्मचरित्र)
