लातूर : देशभरात खळबळ उडवून देणार्‍या नीट पेपरफुटीप्रकरणात (NEET) सीबीआयने लातूरमधील आरसीसी क्लासेसचे सर्वेसर्वा शिवराज मोटेगावकर (Motegaonkar) यास अटक केली आहे. नीट पेपर फोडण्यात मोटेगावकरचा थेट सहभाग असून त्याने 8 दिवस अगोदरच प्रश्नपत्रिका मिळवल्याचं सीबीआयच्या(CBI) तपासातून समोर आलं. त्यानंतर, मोटेगावकरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये, परीक्षेनंतर विद्यार्थ्यांसोबतचा संवाद असेल किंवा आपल्या क्लासेसमध्ये जे शिकवलं तेच परीक्षेत आल्याचं सांगणारा व्हिडिओ असेल. आता, मोटेगावकरचा एक अंधश्रद्धा पसरवणारा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यावर, अंधश्रद्धा निर्मुलन समितीने प्रतिक्रिया देत, पोलीस तपासाची मागणी केलीय. 

Continues below advertisement

नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच राज्यभर चर्चेत असलेल्या शिवराज मोटेगावकर यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते विद्यार्थ्यांवर तांब्याच्या भांड्यातील पाणी गवताच्या सहाय्याने शिंपडताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओनंतर विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी तर हा अशोक खरातसारखाच घोर प्रकार असल्याची भावना सोशल मीडियातून व्यक्त केलीय. आता, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष माधव बावगे यांनीही अशा प्रकारावर आक्षेप घेतला आहे.

पोलिसांनी कसून चौकशी करावी - बागवे

शैक्षणिक क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवला पाहिजे, त्याठिकाणी असे काम आणि अंधश्रद्धेचे प्रकार घडत असतील तर याचा जाहीर निषेध महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते, अशी प्रतिक्रिया माधव बावगे यांनी दिली. तसेच पोलिसांनी याची कसून चौकशी करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. दुसरीकडे आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही ट्विट करुन प्रश्न विचारला आहे. AIMS मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांवर शिवराज मोटेगावकर यांनी “मंतरलेले पाणी शिंपडले. मग हे नेमकं अशोक खरात यांच्या “उष्णो जल”च्या दाव्यांपेक्षा वेगळं कसं? जेव्हा अंधश्रद्धा हा व्यवसाय बनतो आणि मोठ्या लोकांशी ओळखी हे संरक्षणाचं कवच बनतं, तेव्हा त्याची किंमत सामान्य जनतेला मोजावी लागते. चमत्कारांचे दावे करणारी व्यक्ती तरुणांच्या विचारविश्वाला दिशा देण्याच्या भूमिकेत असू नये. दैवी उपचारांचे दावे असोत, श्रद्धेचे शोषण असो किंवा सत्तेचा गैरवापर असो,उपाय एकच आहे, निष्पक्ष चौकशी, आणि सर्वांसाठी समान न्याय, असे विजय कुंभार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, आता या व्हायरल व्हिडिओवरुन मोटेगावकरवर कारवाई होती का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Continues below advertisement

हेही वाचा

आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया