(Source: Poll of Polls)
Latur News: प्रेम करणं जीवावर बेतले; प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, नाका तोंडात मिरची पावडर टाकून केली होती मारहाण
बळीराम नेताजी मगर याचे गावातील एका मुलीवर प्रेम होते. याची कुणकुण मुलीच्या घरच्यांना लागली. बळीरामच्या नाका तोंडामध्ये मिरची पावडर टाकण्यात आली.
लातूर : प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या तरुणाचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला आहे.नाका तोंडात मिरची पावडर टाकून मारहाण करण्यात आली होती . पंधरा दिवस तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर काल रात्री त्याचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातील (Latur News) भादा या गावात ही घटना घडली आहे.
लातूर जिल्ह्यातील भादा या गावातील वीस वर्षीय तरुण बळीराम नेताजी मगर याचा शनिवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बळीराम नेताजी मगर याचे गावातील एका मुलीवर प्रेम होते. याची कुणकुण मुलीच्या घरच्यांना लागली. या बाबत जाब विचारण्यासाठी त्याला 3 जून रोजी बोलवून घेण्यात आले. भादा गावाच्या शिवारात त्यास बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी त्याच्या नाका तोंडामध्ये मिरची पावडर टाकण्यात आली. प्रचंड मार लागल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी भादा पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ यातील पाच आरोपी अटक केले होते. यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिला आरोपी यांचा समावेश आहे.
गावात तणावाचे वातावरण
मारहाण झाल्यामुळे बळीराम मगर यास लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र छातीत मोठ्या प्रमाणात मिरची पावडर गेली होती. तसेच डोळ्यांना ही खूप इजा झाली होती. मागील 15 दिवसापासून बळीराम वर उपचार सुरू होते मात्र त्याचा काल रात्री मृत्यू झाला बळीराम चा मृत्यू झाल्याची माहिती गावात धडकल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आज त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत .
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
बळीरामला 3 जूनला जी अमानुष मारहाण करण्यात आली होती तो व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. मारहाण करताना बळीरामच्या नाका तोंडात मिरची पावडर टाकताना महिला दिसत आहे. काठीने त्यास जबर मारहाण होत आहे. तो व्हिडिओ पहाताना अंगावर काटा येत आहे. मारहाण झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता बळीरामच्या मृत्यूनंतर पुन्हा गुन्ह्याच्या कलमात वाढ करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती औसा विभागाचे डी वाय एस पी रामदास इंगवले यांनी दिली आहे.
मृत बळीरामच्या कुटुंबीयांना याबाबत बोलते करण्याचा प्रयत्न केला असता कुणीही बोलण्यास तयार नाहीत. बळीरामच्या वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. आई नाही.. मोठा भाऊ पुण्यामध्ये खासगी नोकरी करतो. बळीराम गावातील चार एकर शेती पाहत ट्रॅक्टरचा व्यवसाय करत होता. चुलत्याच्या घरी तो राहत असे.
प्रेम करणे गुन्हा नव्हेचमात्र गाव पातळीवर असे प्रकरण समोर आली तर गावात आपली बदनामी होते म्हणून लोक असे आक्रमक होतात. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.