Latur Zilla Parishad Result 2026 : राज्यातील ग्रामीण राजकारणाचा कौल आज लागणार आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांची आज मतमोजणी होणार असून सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल. या निवडणुकांमधून कोण गुलाल उधळणार आणि कोणाला पराभवाची धूळ चारावी लागणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
या निवडणुकांमध्ये 731 जिल्हा परिषद सदस्य पदांसाठी आणि 1,462 पंचायत समिती सदस्य पदांसाठी शनिवारी मतदान पार पडलं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. तब्बल 7,438 उमेदवार निवडणूक रिंगणात असून महायुतीची विजयी घोडदौड कायम राहणार की माविआ कमबॅक करणार, हे आज स्पष्ट होणार आहे.
लातूर जिल्ह्यावर विशेष लक्ष
लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली असून आज मतमोजणी होणार आहे. प्रशासनाकडून मतमोजणीसाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. लातूर जिल्हा परिषदेसाठी 59 जागा, तर 10 पंचायत समित्यांमधील 118 जागांसाठी मतदान झालं. जिल्ह्यातील 9 लाख 51 हजार 235 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 64 टक्के मतदान नोंदवण्यात आलं आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 242 उमेदवार, तर पंचायत समिती निवडणुकीसाठी 419 उमेदवार रिंगणात होते. मतमोजणीनंतर त्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार आहे.
दहा तालुक्यांत मतमोजणी
लातूर, अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, जळकोट, चाकूर आणि देवणी या दहा तालुक्यांतील विविध केंद्रांवर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 1500 पेक्षा अधिक शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लातूर तालुक्यात 20 टेबलांवर मतमोजणी होणार असून सकाळी 10 वाजता पहिल्या फेरीनंतर कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
लातूर जिल्हा परिषद : 59
लातूर जिल्ह्यातील 10 पंचायत समितीच्या एकूण 118 जागा
१) लातूर पंचायत समिती : 20२) औसा पंचायत समिती : 18३) रेणापूर पंचायत समिती : 08४) चाकूर पंचायत समिती : 10५) अहमदपूर पंचायत समिती :12६) उदगीर पंचायत समिती : 14७) जळकोट पंचायत समिती : 06८) निलंगा पंचायत समिती : 20९) देवणी पंचायत समिती : 06१०) शिरूर अनंतपाळ पंचायत समिती : 04
महत्त्वाचं म्हणजे लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची एकही जागा बिनविरोध नाही, त्यामुळे निकाल अधिकच चुरशीचा ठरणार आहे. ग्रामीण सत्तेचा किल्ला कोण जिंकणार, कोणाची स्वप्नं भंगणार आणि कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार, याचं उत्तर काही तासांत मिळणार आहे. लातूरसह राज्यातील ग्रामीण राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
