लातूर :अखिल भारतीय छावा संघटनेनं माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिलं. निवेदन दिल्यानंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते आणि प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे हे रेस्ट हाऊसच्या दुसऱ्या हॉलमध्ये बसले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीसंदर्भात विजयकुमार घाडगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Continues below advertisement

विजयकुमार घाडगे काय म्हणाले?

अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांना माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करणारं निवेदन दिलं. दोन दिवसांपूर्वी ते पत्ते खेळताना आढळून आले, म्हणून असे कृषी मंत्री नका ठेवू असं सांगणारं निवेदनं दिलं. त्यानंतर बाहेर येऊन दुसऱ्या हॉलमध्ये बसलो. त्यानंतर राष्ट्रवादीचे गुंड लोक आले आणि  त्यांनी आमच्यावर हल्ला केला. सत्तेचा माज काय असतो तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला.  अजित पवार यांना सांगणं आहे, अजितदादा तुमच्या कार्यकर्त्यांनी छावाला डिवचलं आहे, छावा म्हणजे शेतकऱ्यांची पोरं आहेत. या गोष्टीचा हिशोब होणार, चुकीच्या पद्धतीनं लोकांना हात घातला आहे. निवेदनाला लाथाबुक्यांनी उत्तर देत असाल तर छावा संघटना आपल्या स्टाइलनं उत्तर देईल. याची राजकीय सामाजिक किंमत तुम्हाला मोजावी लागेल. 

मारहाण करणारं माझ्या ओळखीचं नव्हतं, सत्तेचा माज आलेला आहेना, तो बरोबर नाही कोणी ताम्रपट घेऊन आलेला नाही.  शेवटी त्यांचाच  राज्यकारभार आहे, सगळ्या एजन्सी त्यांच्या मनावर चालतात. पोलीस शेतकऱ्यांची पोरं आहेत, माझ्या कार्यकर्त्यांवर बळाचा वापर करत आहात.  एखाद्या दिवशी याचं उत्तर मिळेल, असं विजयकुमार घाडगे म्हणाले. या घटनेनंतर लातूरच्या विश्रामगृहाजवळ छावाच्या कार्यकर्त्यांनी जमण्यास सुरुवात केली. 

Continues below advertisement

लातूरमध्ये नेमकं काय घडलं? 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे त्यांच्या कार्यकर्त्यांसह तिथं आले. त्यांनी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली. याबाबतचं निवेदन तटकरेंना देण्यात आलं. याच दरम्यान छावाच्या कार्यकर्त्यांनी टेबलावर पत्ते फेकले. यानंतर घोषणाबाजी करत छावाचे कार्यकर्ते तिथून निघून गेले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि इतर  कार्यकर्त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली.  

योगेश केदार यांनी छावा संघटनेच्या शेतकरी नेते असलेल्या विजय घाडगे यांना मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादिच्या सूरज चव्हाण यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्याची मागणी केली. या मारहाणीचा जाहीर निषेध करत असल्याचं योगेश केदार म्हणाले. राज्यात लोकशाही आहे की ठोकशाही आहे याचे उत्तर अजितदादा पवारांनी द्यावे, असं सवाल योगेश केदार यांनी केला.