वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
लातूरमधील गरिब शेतकरी दाम्पत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून लातूर जिल्ह्यासह देशभरातून अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

लातूर : एकीकडे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठ-मोठ्या घोषणा केल्या जातात, हजारो कोटींची कर्जमाफी केली जाते, हिताचे निर्णय केले जातात. मात्र, आजही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बहुतांश शेतकऱ्यांच्या आयुष्यात आणि दररोजच्या जगण्यात मोठा काळोखच आहे. कधी निसर्गाचं संकट, तर सरकारचा दुर्लक्षितपणा बळीराजाला उघडं नागडं करत असल्याचं पाहायला मिळतं. लातूर (Latur) जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील मन हेलावणारी आणि तितकाच संताप आणणारी घटना सध्या एका व्हिडिओच्या (Viral video) माध्यमातून समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच्या अवकाळी पावसाने वीज कोसळली अन् शेतातला एक बैल गेला. त्यामुळे, आता बैलाच्या जागी स्वतःची पत्नी जुंपून शेतकरी नांगरणी करत असतानचे हे भीषण वास्तव सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे.
लातूरमधील गरिब शेतकरी दाम्पत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून लातूर जिल्ह्यासह देशभरातून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. नांगराला एका बाजूला बैल...तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याची पत्नी... लातूरच्या देवणी तालुक्याच्या बोंबळी बु. गावातील शेतकरी हौसाबाई आणि काशिनाथ गायकवाड यांचा व्हायरल व्हिडीओ पाहून कुणाच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. कारण, बैलाची जागी शेतकरी माय जुंपल्यानं डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत.
काही महिन्यांपूर्वी एक लाख वीस हजार रुपये खर्च करून त्यांनी बैलजोडी खरेदी केली होती. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसात वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाला. आधीच आर्थिक संकट, त्यात नव्या बैलासाठी पैसा नाही. पावसाळा सुरू झाल्याने समोर पेरणीचा हंगाम. मग, परिस्थितीला तोंड तर द्यायलाच हवं, गायकवाड कुटुंबाने एक कठीण निर्णय घेतला. बैलाच्या जागी स्वतःची पत्नी हौसाबाई यांना जुंपून शेताची मशागत सुरू केली. वीज कोसळून बैल मेला म्हणून शेतकऱ्यानं माय नांगराला जुंपल्याचा हा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले, सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून शासनाने पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे.
पतीसह बटईनं शेती करणारी माऊली
मागील अनेक वर्षांपासून दुसऱ्यांची शेती कसायला घेणारे हे कुटुंब यावर्षी दहा एकर जमीन कसत आहेत. स्वतःच्या नावावर एक एकर सुद्धा जमीन नाही, बटईनं घेतलेल्या शेतीवरच चार मुलींचे लग्न, दोन मुलांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. लागवडीचा खर्च त्यांचाच... मेहनत त्यांचीच... आणि उत्पन्नाची वाटणी जमीन मालकाशी...अशा परिस्थितीत खत-बी बियाणे घ्यायचे की नवीन बैल विकत घ्यायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ चित्रित केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका बैलाच्या मृत्यूने शेतकरी कुटुंबावर आलेलं हे संकट आणि शेतीसाठी सुरू असलेली त्यांच्या जीवाची धडपड व्हिडिओमधून स्पष्टपणे दिसून येत आहे.
हेही वाचा
Sameer Bhujbal: भाजपचा विरोध नव्हताच, माझा शपथविधी निश्चित होता, पण.....,समीर भुजबळांचा गौप्यस्फोट
Before You Go
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले





















