लातूर : मराठवाड्यात एकीकडे डिझेल आणि पेट्रोलची (Petrol) टंचाई सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता गॅस सिलेंडरच्या टंचाईच्याही झळा सर्वसामान्यांना बसत असल्याचं दिसून येत आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील निलंग्यात चक्क माळरानावर चढ्या दराने गॅस (Gas) सिलेंडरची तुफान विक्री होतेय. सिलेंडरचा काळाबाजार थेट माळरानावर अधिकृत भारत गॅसच्या वाहनातून होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून जागृत गॅस ग्राहकानेच हा व्हिडिओ समोर आणला आहे. त्यानंतर, जिल्हा पुरवठा विभागाने या व्हिडिओची दाखल घेत कारवाईला सुरुवात केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली.

Continues below advertisement

ना दुकान… ना गोदाम… चढा भाव  दिल्यास... माळरानावर, रस्त्यावर सिलेंडरही तुम्हाला सिलेंडर मिळणार असाच काहीसा प्रकार निलंगा तालुक्यात सुरू असल्याचं दिसून आलं. एका गॅस ग्राहकाने व्हिडिओ करत एजन्सी धारकाची पोलखोल केली असून यासंदर्भात पुरवठा विभागाकडे कारवाईसाठी तक्रारही करण्यात आली आहे. निलंगा शहरात भारत गॅस एजन्सीचा मनमानी कारभार उघडकीस आला असून, गॅस टंचाईचे कारण सांगत ग्राहकांना चढ्या दराने रस्त्यावर सिलेंडर विक्री केली जात असल्याचा गंभीर प्रकार व्हिडिओत कैद झाला आहे. निलंगा शहरात घरगुती गॅसचा काळाबाजार सुरू असल्याचे समोर आले आहे. एकीकडे अधिकृत बुकिंग करुनही ग्राहकांना गॅस मिळत नसताना, दुसरीकडे एजन्सीकडून रस्त्यावर आणि माळरानावर कोणतीही कागदपत्र न पाहता... बुकिंग केलेली नसतानाही चढ्या दराने सिलेंडर विक्री केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले व्हिडिओ

“गॅस नाही” असे सांगून ग्राहकांना परत पाठवले जाते. मात्र, जादा पैसे देणाऱ्यांना गुप्तपणे सिलेंडर दिले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार निलंगा शहराजवळील एका रस्त्याच्या बाजूला सुरू होता गॅस ग्राहकांनी तो मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. सध्या याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. जिल्हा पुरवठा विभागात याबाबतची तक्रार केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. आमच्याकडे अशा पद्धतीने गॅसची विक्री सुरू असल्याची माहिती आणि व्हिडिओ आला. अतिशय अयोग्य पद्धतीने हे काम सुरू आहे हे लक्षात आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे मत जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांनी व्यक्त केले. दरम्यान, निलंग्यातील भारत गॅस एजन्सीच्या वितरकांशी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेता आलं नाही.

Continues below advertisement

लातूरमध्ये दोन पेट्रोलपंपांचा इंधन पुरवठा बंद

नियमांचे उल्लंघन करून कॅन आणि बॅरलमधून पेट्रोल-डीझेल विक्री होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने मंत्री पेट्रोलियम आणि रजनी पेट्रोलियम या दोन पंपांचा इंधन पुरवठा तात्काळ बंद केला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाईन्स नुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा

लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा