Latur Accident : लातूरमध्ये भीषण अपघात, कार आणि ट्रकच्या धडकेत तीन माजी सैनिक ठार, एक गंभीर जखमी
Latur Accident : कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानंतर कारचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला.

लातूर : कर्नाटकातील बिदरवरून लातूरला येणाऱ्या तीन माजी सैनिकांवर काळाने घाला घातला. कार आणि ट्रकच्या धडकेत चार पैकी तीन माजी सैनिकांचा जीव गेला. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. यावेळी बाजूने जात असलेल्या मोटरसायकलवरील व्यक्तीला किरकोळ मार लागला आहे.
लातूर जिल्ह्यातील मूळचे असणारे माजी सैनिक हे बिदरला गेले होते. आपल्या कारणे ते वापस लातूरकडे निघाले होते. लातूर जिल्ह्यातील करडखेल पाटी येथे कार आणि ट्रॅकची भीषण धडक झाली. या अपघातात कारमधील चार माजी सैनिक पैकी तीन जणाचा जागीच मृत्यू झाला आहे.यात एक जण गंभीर जखमी झाला आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की यात कारचा समोरचा भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात यादवराव तुळशीराम काळे (वय 58) रा. सुगाव ता. चाकूर, बब्रुवान मारोती मेखले (वय 62) रा. सुगाव ता. चाकूर आणि विठ्ठल बाबुराव यचवाड (वय 58) रा. अकराई ता. लातूर हे तिघे माजी सैनिक जागीच ठार झाले आहेत. तर हुजूर दुलूखा पठाण (वय 58) रा. सुगाव ता. चाकूर हे गंभीर जखमी झाले आहेत.
गंभीर जखमी झालेल्या हुजूर पठाण यांना सुरवातीला उदगीर आणि नंतर लातूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या अपघातात ट्रकचा एका मोटारसायकललाही धक्का लागला असून यात मोटारसायकलवरील ग्यानोबा बाबुराव बजगीरे रा. करडखेल ता. उदगीर हे किरकोळ जखमी झाले आहेत.
तिन्ही मयतांचे हेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात येत आहे. घटनास्थळी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात मयतांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या





















