लातूर : छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्ती करू नये, दादागिरी खपवून घेणार नाही असा इशारा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला होता. त्याला आता छावा संघटनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आम्ही कोणत्या नेत्याची किंवा पक्षाची हुजरेगिरी करत नाही, शेतकऱ्यांच्या हितासाठी गुंडगिरी करणार, मार खावा लागला तरी खाणार असं छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे म्हणाले.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत छावाच्या विजयकुमार घाडगे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन दिलं. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजयकुमार घाडगे यांना मारहाण केल्याची घटना घडली. त्याच्या निषेधार्थ छावा संघटनेच्या वतीने सोमवारी लातूर बंदची घोषणा करण्यात आली.
शिवेंद्रराजेंचा इशारा
लातूर बंदची घोषणा झाल्यानंतर त्यावर पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला. या संपासाठी जबरदस्ती करु नका, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला होता. त्यावर छावाच्या वतीने प्रत्युत्तर देण्यात आलं.
शेतकऱ्यांसाठी जबरदस्ती करणार
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही गुंडगिरी करणार, जबरदस्ती करणार, मारही खाणार. पण मागे हटणार नाही. आम्ही कोणत्या नेत्याची किंवा कोणत्या पक्षाची हुजरेगिरी करत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही संघर्ष करणारे लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे, शेतकऱ्याचं नुकसान ते आमचं नुकसान या नुसार आम्ही काम करतो. त्यामुळे राजेंनी असं म्हटलं तर त्यांना एकच उत्तर आहे, तुमच्याच घराण्याने घालून दिलेला वारसा आम्ही पुढे नेतोय.
लातूरमध्ये उलट-सुलट चर्चा
दादागिरी आणि जबरदस्ती चालणार नाही असा इशारा शिवेंद्रराजें भोसले यांनी छावा संघटनेला दिला होता. यावरुन लातूरमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. शिवेंद्रराजे भोसले हे लातूरचे पालकमंत्री असून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून त्यांना मानणारा मोठा वर्ग लातूरमध्ये आहे.
ही बातमी वाचा :