Latur News : राज्यातील बहुतांश भागात सध्या पडत असलेल्या पावसाने (Rain News) एकच धुमाकूळ घालत जनजीवन पूर्णतः विस्कळीत केलं आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला (Marathwada Rain News) बसला असून यात बळीराजा पुरता हवालदिल (Maharashtra Floods) झाला आहे. कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यात (Marathwada) अतिवृष्टीने सर्वत्र दाणादाण उडवली असल्याचे चित्र आहे. तर एकीकडे पावसामुळे निसर्गाची अवकृपा झाली असताना याच मराठवाड्यातील निलंगा (Nilanga) तालुक्यातील कलांडी खडकउमंरगा आणि डांगेवाडी या गावात एक विचित्र घटना घडली आहे. यात 29 सप्टेंबर रोजी अवघ्या दोन तासांत भूगर्भातून पाच वेळा भयानक आवाज झाल्याने धरणी हलल्याचा अनुभव नागरिकांना आलाय. तर अचानक झालेल्या या घटनेमुळे नागरिकांनी घराबाहेर पळ काढत पावसात रस्त्यावर आश्रय घेतलाय.
भयभीत होऊन हजारो नागरिक रात्रभर पावसात रस्त्यावर (Noise from Underground in Latur)
मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा तालुक्यातील कलांडी खडकउमंरगा आणि डांगेवाडी या तीन गावात दोन तासांत पाच वेळा भूगर्भात भयानक आवाज आलाय. परिणामी नागरिक भयभीत होऊन हजारो नागरिक रात्रभर पावसात रस्त्यावर थांबलेत. सध्या संपूर्ण गावात भीतीचे वातावरण असल्याचे चित्र आहे. दरम्यान, “आम्ही वारंवार प्रशासनाला माहिती दिली, पण कोणीही गावात फिरकले नाही,” असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, या आवाजानंतर जमिनीमध्ये कंप जाणवत असून घरांची भिंती थरथरत आहेत. त्यामुळे गावात अफवांनाही उधाण आले आहे. काहींचे म्हणणे आहे की, हे भूगर्भातील हालचालीमुळे होत असावे, तर काहींनी भूकंपाचा इशारा असल्याची भीती व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना पसरली असून तातडीने तज्ज्ञांचा अहवाल घेऊन प्रशासनाने गावकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. त्यामुळे या प्रकरणी आता प्रशासन नेमकं काय पाऊल उचलतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गावकऱ्यांना 32 वर्षांपूर्वीच्या भूकंपाची आठवण ( Latur Earthquake In 1993)
1993 साली गणेश विसर्जनानंतरच्या दुसऱ्या दिवशी पहाटे भूकंपाचा धक्का बसला होता. यात हजारो लोकांचे प्राण गेले होते. त्यातच भूगर्भातून मोठा आवाज येत असल्याने कलांडी खडक उमंरगा आणि डांगेवाडी गावातील नागरिकांना 32 वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपाची आठवण होत आहे. 30 सप्टेंबर 1993 ची पहाट महाराष्ट्र कधीच विसरु शकत नाही. गणपती विसर्जनानंतरचा दिवस. संपूर्ण महाराष्ट्र साखर झोपेत असताना लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि आजूबाजूची गावे भूकंपाने हादरुन गेली. हजारो लोक झोपेतच गाडले गेले. 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने सात हजारांपेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला, 16 हजार लोक जखमी झाले. तर 52 गावांमधील 30 हजार घरे धरणीच्या पोटात गडप झाली.
ही बातमी वाचा: