लातुरात काँग्रेस उमेदवाराच्या कॉलेजमध्ये दारुचे 12 बॉक्स जप्त
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर | 16 Feb 2017 09:04 AM (IST)
लातूर : लातूरमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या कॉलेजमध्ये दारुच्या बाटल्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मतदारांना आमिष दाखवण्यासाठी दारु आणल्याच्या आरोपावरुन उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूरमधील औसा तालुक्यात काँग्रेसतर्फे वेताळेश्वर भीमाशंकर बावगे हा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. बावगे यांनी राजीव गांधी पॉलिटेक्निकमध्ये दारुच्या बाटल्या ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. यावेळी दारुच्या बाटल्यांचे 12 बॉक्स जप्त करण्यात आले. प्रत्येक बॉक्समध्ये देशी दारुच्या 48 बाटल्या आढळल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा आढळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बावगेंविरोधात मतदारांना अमिष दाखवण्यासाठी दारु आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.