Maharashtra-Karnataka Border Dispute : मराठी माणसांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, मराठी माणसांची गळचेपी करू नका, असा इशारा देत रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल में, संयुक्त महाराष्ट्र समितीचा विजय असो, अशा घोषणांनी कोल्हापुरात सीमावासियांसाठी एल्गार करण्यात आला. बेळगावहून आलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. बेळगावहून रॅलीने कार्यकर्त्यांचे आगमन झाल्यानंतर शिवाजी चौकात शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. सीमाप्रश्न सुटेपर्यंत हा भाग केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोल्हापुरातून सर्वपक्षीय नेत्यांकडून मोर्चाला पाठिंबा देण्यात आला. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तासांहून अधिक काळ धरणे आंदोलन केल्यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. 


यावेळी बेळगाव आमच्या हक्काचे-नाही कोणाच्या बापाचे, बेळगाव-कारवार-निपाणी-बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे- नही तो जेल में, संयुक्त महाराष्ट्र समितीचा विजय असो, अशा घोषणांनी मोर्चा दणाणून गेला. डोक्यावर भगवी टोपी आणि हातात भगवा झेंडा घेऊन कोल्हापूरकरांनी सीमावासियांना पाठिशी असल्याची ग्वाही दिली. सीमाप्रश्न सुटेपर्यंत केंद्रशासित प्रदेश करावा, अशी आग्रही मागणी यावेळी केंद्र सरकारकडे करण्यात आली. (Maharashtra-Karnataka Border Dispute) 


मराठी माणसांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, मराठी माणसांची गळचेपी करू नका, असा इशारा यावेळी कानडी सरकारला देण्यात आला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दसरा चौक येथून मोर्चाला प्रारंभ झाला. सीमावासियांना पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या संघटना, पक्षाचे कार्यकर्ते दसरा चौकात एकवटले होते. दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला. कार्यकर्त्यांनी मोर्चा मार्गावर संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. भाजप, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, शेकाप आरपीआय, डाव्या संघटनेसह वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. (Maharashtra Ekikaran Samiti protest rally in Kolhapur)


यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक,माजी मंत्री भरमू पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार राजू आवळे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, मनसेचे पुंडलिकराव जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पोवार यांची  भाषणे झाली. 


धनंजय महाडिक म्हणाले की, सीमाभागातील 865 गावे ही महाराष्ट्रात समाविष्ट झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. आमची छाती उघडून पाहिले तर संयुक्त महाराष्ट्राचे चित्र दिसेल. सीमा भागातील विद्यार्थी, शाळा यांना वेगवेगळ्या सुविधा देण्याची सरकारची भूमिका आहे. लवकरच हा प्रश्न निकाली लागेल. दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते बेळगावहून मोठ्या संख्येने कोल्हापुरात दाखल झाले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी माजी आमदार मनोहर किणीकर, मालोजी अष्टेकर, दिगंबर पाटील, माजी महापौर प्रकाश शिरोळकर, शिवाजी सुंठकर, सरिता पाटील, रेणू किल्लेदार, विकास कलगटगी, शिवानी पाटील, साधना पाटील, शुभम शेळके, विजय शिंगटे, वकील सुधीर चव्हाण आदींचा सहभाग होता. 


इतर महत्वाच्या बातम्या