Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या विजयासाठी घरी पूजाअर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे सर्व आमदार पवार साहेब यांच्या पाठीशी उभे राहतील, संजय पवार साहेब यांचा विजय होईल, असा विश्वास संजय पवार त्यांच्या पत्नी ज्योस्त्ना पवार यांनी व्यक्त केला.
बाळसाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद कायम राहिला आहे, त्यामुळे शाखा प्रमुख ते खासदार असा प्रवास नक्की होईल, असा विश्वास त्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला. दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) मतदान सुरु झाले आहे. महाराष्ट्रात सहा जागांसाठी मतदान होत आहे. राज्यसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू सुरुवातीपासूनच कोल्हापूर जिल्हा राहिला आहे.
संभाजीराजेंनी शिवसेनेकडून शिवबंधन नाकारल्यानंतर संजय पवारांच्या (Sanjay Pawar) गळ्यात उमेदवारीची माळ पडली, तर भाजपनेही राजकीय खेळी करताना धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना उमेदवारी देत निवडणुकीतील चुरस वाढवली. सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात थेट लढत होत आहे.
कोल्हापुरात राजकीय उत्सुकता शिगेला
संभाजीराजेंनी शिवसेनेचा प्रस्ताव नाकारल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी मिळाली. त्यांच्या विजयासाठी शिवेसेनेने चांगलीच कंबर कसली आहे. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ संजय पवार शिवसेनेमध्ये सक्रीय आहेत. दुसरीकडे भाजपने धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवत कोल्हापूरच्या दोन मल्लांमध्ये कुस्ती लावून दिली आहे.
जिल्ह्यात महाडिक गटाला विजयाची चव चाखता आलेली नाही. त्यामुळे महाडिक यांनीही विजयासाठी गेल्या काही दिवसांपासून पायाला भिंगरी लावली होती. त्यांचे कट्टर राजकीय विरोधक पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनीही महाडिकांना रोखण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे विजयी गुलाल कोण उधळणार याचे उत्तर आज संध्याकाळी साडे सातपर्यंत मिळेल. मात्र, कुस्ती कोण मारणार ? याची उत्सुकता कोल्हापुरात शिगेला पोहोचली आहे.
कोणाकडे किती मतं आहेत ?
शिवसेनेचे 55 आमदार, राष्ट्रवादी 53, काँग्रेस 44, भाजप 106, बहुजन विकास आघाडीचे (BVA) तीन, समाजवादी पक्ष, एआयएमआयएम आणि प्रहार जनशक्ती पक्ष प्रत्येकी दोन, मनसे, माकप, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज्य शक्ती पक्ष, क्रांतिकारी शेतकरी पक्ष यांचा प्रत्येकी एक आमदार आणि 13 अपक्ष आमदार आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट सामना होणार आहे. महाविकास आघाडी आणि भाजप छोटे पक्ष आणि अपक्ष यांच्या 25 इतर मतांवर विसंबून आहेत.