Kolhapur KMT : प्रचंड तोट्यात असूनही केएमटी विविध ग्रामीण मार्गांवरून धावत असल्याने केएमटीचा (Kolhapur KMT) मुद्दा पुन्हा तापला आहे. केएमटी अधिकारी आणि शहरातील साामाजिक संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत केएमटीने केलेल्या सर्वेक्षणाची माहिती दिली, तर आतापर्यंत किती तोटा झाला आहे याची माहिती दिली. 


ॲड. बाबा इंदूलकर यांनी केएमटीच्या 24 पैकी 22 मार्गांवर प्रचंड तोटा असतानाही चालवली जात असल्याने संताप व्यक्त केला. बाबा इंदूलकर एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, 1 जानेवारी ते ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये केएमटीच्या 24 मार्गांमुळे 14 कोटींचे नुकसान झाले आहे. असे असतानाही कोल्हापूर शहारातील जनतेच्या कररुपातील 11 कोटी 37 लाख रुपये केएमटीसाठी महापालिकेकडून वर्ग करण्यात आले. हा पैसा विकासकामांसाठी होता तो त्यासाठी वापरता आला असता. केएमटीचे 24 पैकी 22 रुट हे ग्रामीण भागातील असून जे तोट्यातील आहेत.


ते पुढे म्हणाले, कोल्हापूर शहरासाठी बससेवा असावी असा शासकीय आदेश आहे. मात्र, नेत्यांना खुश ठेवण्यासाठी ग्रामीण भागात बससेवा चालवतं, त्याचा त्रास शहरातील सर्वसामान्य जनतेला होत आहे. नवीन रस्ते सोडा, खड्डे भरण्यासाठी गेल्या 15 दिवसांपासून डांबर खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने काम थांबवण्यात आलं आहे. डांबर आणण्यासाठी पैसे नाहीत, आणि गावकी आमच्या पैशावर चालवतात. हा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय आहे. जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंते हे युद्ध सुरु राहणार, वेळप्रसंगी हे पैसे अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागली तरी चढू.


पाच मार्गांवर तब्बल 19 फेऱ्या प्रचंड तोट्यात  


दरम्यान, केएमटीकडून शहर तसेच ग्रामीण भागामधील तोट्यातील प्रत्येक मार्गावरील फेऱ्यांचे सर्वेक्षण केले. कंदलगाव, पेठवडगाव, कळंबा, कागल, कुडित्रे या पाच मार्गांवर तब्बल 19 फेऱ्या प्रचंड तोट्यात आहेत. त्यामुळे त्या मार्गांवरील बससेवा बंद करण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासक व अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवल्याची माहिती केएमटीच्या अतिरिक्त परिवहन आयुक्त टिना गवळी यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत दिली.


10 महिन्यात 14 कोटींचा तोटा होत असताना ग्रामीण भागात बस का पाठवत आहात? असा प्रश्‍न सामाजिकप संघटनांनी उपस्थित केल्यानंतर महापालिकेने केएमटीला 11 कोटींचे सहाय्य केल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार कारवाई करण्याचे अधिकार वरिष्ठांचे असून त्यानुसार अहवाल दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी, सप्टेबर महिन्यात कोल्हापूर शहर हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांना देण्यात येणाऱ्या बसेसेवेला हद्दवाढ कृती समितीने कडाडून विरोध करत सेवाच बंद पाडली होती. 


कोल्हापूर शहरात हद्दवाढीवरून दोन गट; लोकप्रतिनीधींकडून सोयीस्कर दुर्लक्ष 


दुसरीकडे, कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर महापालिकेची परिस्थिती बदलण्यासाठी हद्दवाढ क्रमप्राप्त असल्याने शहरातील लोकप्रतिनिधींकडून ठाम भूमिका अपेक्षित आहे. मात्र, त्यांच्याकडून झालेले सोयीस्कर दुर्लक्षाने ताप वाढत चालला आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून दोन गट पडले आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहर विरुद्ध हद्दवाढीतील गावे असा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे शहराची स्थिती सुधारण्यासाठी लोकप्रतिनीधींनी एकत्र येऊन गावांना विश्वास देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा हा प्रश्न अधिकच चिघळत राहणार आहे यात शंका नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या