Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महानगरपालिका भ्रष्टाचाराच्या टक्केवारीने किती खोलवर बरबटलेली आहे याची चर्चा वारंवार होत राहिली. मात्र याबाबत लेखी काहीच समोर काही येत नसल्याने फक्त आरोप होत राहिल्याने आरोपांचा फक्त धुरळा होत राहिल. मात्र, कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या कंत्राटदराने समोर येत अगदी आयुक्तांपासून ते क्लार्कपर्यंत किती टक्केप्रमाणे किती रुपये दिले याचीच पोलखोल करणारी यादी सादर केली आहेत. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेसह कोल्हापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूर महापालिकेमध्ये कामे न करता 85 लाखांचे बिल उचलले असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे संघटक सत्यजित कदम यांनी केल्यानंतर आता आपण कंत्राटदाराने समोर येत आपण आरोप फेटाळून आपण काम केलं असल्याचं म्हटलं आहे. कोणाला किती टक्केवारी दिली याची यादीच ठेकेदार श्रीप्रसाद संजय वराळे (रा. घर नंबर 700, आंबेडकर नगर, कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी निवेदनातून दिली आहे. वराळे यांनी स्वतः वृत्तपत्र कार्यालयांमध्ये येऊन निवेदन दिलं आहे त्यांनी या निवेदनाचा मेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महापालिका प्रशासक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पुणे, पोलीस अधीक्षक यांना सुद्धा दिला असल्याची माहिती दिली. वराळे यांनी कसबा बावड्यातील ड्रेनेजचे काम न करता 85 लाख रुपयांची बिले उचलल्याचा आरोप सत्यजित कदम यांनी केल्यानंतर वराळे यांनी थेट टक्केवारीसह कामाची यादी दिली आहे.

काय म्हटलं आहे वराळे यांनी? त्यांच्याच शब्दात केलेला खुलासा! 

माझ्या नावे मंजूर असणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत होणाऱ्या प्रभाग क्रमांक दोन कसबा बावडा पूर्व बाजू अंतर्गत जाधव घर ते बडबडे मळा ड्रेनेज पाईपलाईन टाकणे, सदर कामातील पाचवे रनिंग बिल 85 लाख रुपये घेतले असा आरोप करण्यात आला आहे. परंतु, सदर पाचवे बिल रक्कम जीएसटीसोबत 72 लाख 16 हजार 396 रुपये 50 पैसे इतकी होती. ती माझ्या महानगरपालिकेमधील नोंदणीकृत युनियन बँक चालू खाते क्रमांक 471101010280337 या खात्यावर दिनांक 24-12 -2014 रोजी सायंकाळी 4 वाजून 39 मिनिटे 6 सेकंदाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या खात्यावरून 67 लाख 58 हजार तीन रुपये इतकी रक्कम माझ्या खात्यावर जमा झाली. सदर कामाच्या बिलासाठी मी महापालिकेतील कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांना 2 टक्के प्रमाणे 1 लाख २० हजार रोख, उपशहर अभियंता कांबळे साहेबांना 1 टक्के प्रमाणे 60  हजार रोख , शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना शासन अनुदान असल्यामुळे दोन टक्के याप्रमाणे 1 लाख 20 हजार रोख महापालिकेमध्ये दिले.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, अकाउंट विभागामधील क्लार्क नाईक साहेब, अधीक्षक सूर्यवंशी साहेब, यांना प्रत्येकी लाखाला 100 याप्रमाणे प्रत्येकी 6 हजार बिलावर सही करताना दिले. ऑडिट विभागामधील क्लार्क यांना लाखाला 100 तसेच लेखापरीक्षक परीट मॅडम यांना लाखाला 200 व मुख्य लेखा परीक्षक मिसाळ मॅडम यांना लाखाला 200 अशा पकारे एकूण 30 हजार रुपये प्रत्येक सही करताना सोबत विभागांमध्ये दिले. तसेच ॲडिशनल कमिशनर रोकडे साहेब यांना 1 टक्के 60 हजार रुपये दिले .सदर बिल मिळण्याकरिता जी शासन नियमावली आहेत त्या पद्धतीनेच मला मिळालं आहे यामध्ये कोणताही घोटाळा करण्यात आलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

पूशाची पूर्तता केल्यानंतरच बिल मला प्राप्त झाली

वराळे यांनी कामासंदर्भात माहिती देताना म्हटले आहे की, सदर बिलांपैकी जागेवर माझे 800mm पाईपचे 1125 रनिंग मीटर काम पूर्ण असून 18 चेंबर्स पूर्ण आहेत. 312 मीटर पाईप जागेवरती उपलब्ध होत्या, त्यापैकी जानेवारीपासून 2025  ते मे 2025 महिन्यापर्यंत मी 70 ते 80 मीटर काम जसं मला जागवती काम करण्यास उपलब्ध होईल ते मी बसवलेले आहेत व त्याचे वेळोवेळीचे व्हिडिओ हे शहर अभियंता उप शहर अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना पाठवले आहेत. परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी विरोध केला असता ते माझे काम थांबले गेले याची मी कल्पना संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना दिले असता त्यांनी जागेवरती येऊन पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेऊन तोडगा काढू अशी अशी ग्वाही दिली होती. सदर कामाचे पैसे परत जाणार म्हणून मला सदर बिलामध्ये झालेल्या काम व थोडी अॅडव्हान्स रक्कम अदा करण्यात आली आहे. सदर कामाची अजून 93 लाख रुपये रक्कम बिलाची महानगरपालिकेमध्ये शिल्लक आहे. मला जर घोटाळा करायचा असता तर मी सर्व रकमेचा केला असता झालेल्या काम व त्यांनी दिलेल्या अॅडव्हान्स रक्कमेचाच का केला हा माझा प्रश्न आहे. याच्या आधी देखील मी महापालिकेमध्ये 2017 पासून काम करतोय माझे कसबा बावड्या मधील पॅवेलियन ग्राउंड विकसित करणे, कसबा बावडा स्मशानभूमी, गटरची कामे, यांची बिले काढतानाही मी वेळोवेळी संबंधित शहर अभियंता उपशहर अभियंता  कनिष्ठ अभियंता व वरील मी नमूद केल्यास सर्वांना नियमाप्रमाणे बिल काढण्यासाठी त्यांनी जी मागणी केली त्याची त्या पैशाची मी पूर्तता करून बिल मला प्राप्त झाले आहेत याची तुम्ही चौकशी करू शकता.

तेव्हा नेत्रदीप सरनोबत यांनी अडीच लाख रोख घेतले 

वराळे यांनी पुढे म्हटले आहे की, मध्यंतरी राजाराम कारखानाच्या संबंधित असणाऱ्या केसमुळे मी तुरुंगात होतो. त्यावेळी मी प्रभाग क्रमांक 6 मधील झूम प्रकल्पामध्ये काम भरतेवेळी माझ्याकडून खोटे साजरी केले हा आरोप केला होता. सदर कामासाठी लागणारे अॅफिडेव्हिट कोणताही ठेकेदार तहसीलदार यांच्यासमोर जाऊन करत नाही ते स्पॅम्प वेंडर यांना सांगून तयार करून घेतात व ते अपलोड करतात सदर न केलेल्या गुन्ह्यासाठी मला ब्लॅक लिस्ट करावे म्हणून महापालिकेला  तक्रार  कॉन्ट्रॅक्टर राहुल पाटील यांच्या द्वारे करण्यात आली होती तिन्ही देखील ते अॅफिडेव्हिट तहसीलदार यांच्यासमोर जाऊन केले आहे का याचा व्हिडिओ पुरावा  त्यांनी सादर करावा. सदर अॅफिडेव्हिट तक्रारीचा फायदा घेऊन तत्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी मला तुझे रजिस्ट्रेशन ब्लॅक लिस्ट करत नाही यासाठी माझ्याकडून कावळा नाका  येथील पोलीस चौकीच्या थोड्या पुढ अंतरावरती मे 2024 मध्ये साधारण दुपारी बारा ते दोन च्या दरम्यान अडीच लाख रुपये रोख रकमेमध्ये घेतले होते व माझ्यावरील मी न केलेल्या गुन्ह्याची कारवाई थांबवली होती. 

दुसरा ठेकेदार व अधिकारी यांना वाचवण्यासाठी माझा बळी

दुसरा ठेकेदार व अधिकारी यांना वाचवण्यासाठी माझा बळी दिला जात आहे. या सर्व अधिकाऱ्यांची संपत्तीची मिळकतींची चौकशी व्हावी सध्या चालू असलेल्या आरोपांमुळे माझ्या घरच्यांचे व माझे मानसिक खच्चीकरण झाले आहे तसेच अब्रूचे लचके काढले आहेत. महापालिका अधिकारी व ठेकेदार बबन पवार याचा मला प्रचंड त्रास देत आहेत. सदर त्रासामुळे ते मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत. माझ्या घरच्यांना व मला काही झाल्यास सर्वस्वी जबाबदार हे ठेकेदार बबन पवार व महापालिकेचे संबंधित अधिकारी असतील. तरी माझी आपणास नम्र विनंती आहे मी मांडलेल्या विषयाचा विनंतीपूर्वक व गांभीर्य लक्षात घेऊन झालेल्या आरोपांचा आपण सखोल चौकशी करून मला न्याय द्यावा ही विनंती, असेही त्यांनी म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या