कोल्हापूर : एक रुपया भिकारी सुद्धा भिक घेत नाही. मात्र, आम्ही पीक विमा देत शेतकऱ्यांना एक रुपयात देत आहोत, असं वक्तव्य करून वादाला तोंड फोडलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कोल्हापूर दौऱ्याला (Manikrao Kokate in Kolhapur) स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani shetkari sanghatana) कडाडून विरोध करण्यात आला. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोपर्यंत माणिकराव कोकाटे माफी मागत नाही तोपर्यंत कोल्हापूरमध्ये प्रवेश करू देणार नाही, असा निर्धार केला होता. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची पोलिसांची चांगली झटापट झाली. यावेळी कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. माणिकराव कोकाटे कोल्हापूर दौऱ्यावरती येत असल्याने सर्किट हाऊस परिसरामध्येमोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेल्या भिकेच्या वक्तव्यामुळे कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे संघटनेकडून आंदोलन होणार हे लक्षात घेऊन पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे सर्किट हाऊस परिसरात आंदोलनासाठी पोहोचलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. माफी मागितल्याशिवाय कोल्हापुरात येऊ देणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानीने घेतली होती. 

काय म्हणाले होते माणिकराव कोकाटे?

सहा दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे म्‍हणाले, हल्‍ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही. आम्‍ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केली. ही योजना चांगली आहे. त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. पण, या योजनेलाही गैरव्यवहाराचे ग्रहण लागले. यामुळे सरकार अडचणीत आलेले नाही, पण यातून आता काही सुधारणा निश्चितपणे कराव्या लागणार आहेत. ही योजना सरकारला कोणत्याही स्थिती बंद करायची नाही. त्यात सुधारणा करायची आहे. या प्रकरणी गैरप्रकार टाळण्यासाठी काही ठोस निर्णय घ्यावे लागतील. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत याविषयी योग्य तो निर्णय घेतला जाईल.

माणिकराव कोकाटे म्हणाले, सद्यस्थितीत पीक विम्याचे 4 लाख अर्ज नामंजूर करण्यात आलेत. सरकार या प्रकरणी कुठेही अडचणीत नाही. अर्जदार व एजन्सी चालकांच्या चुकांमुळे असे घडले असावे असा माझा अंदाज आहे. त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल. पण यात सुधारणा करण्याची गरज आहे.

इतर महत्वाच्या बातम्या