Shivaji University : शिवाजी विद्यापीठामध्ये नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दूरशिक्षण (distance education) तसेच ऑनलाईन शिक्षण केंद्रातून दुहेरी पदवी (double degree) घेता येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक डॉ. डी. के. मोरे यांनी केलं आहे. 


शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत आयोजित केलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबत डॉ. मोरे यांनी माहिती दिली. चालू 2022-23 शैक्षणिक वर्षापासून या संधीचा लाभ घेता येणार आहे. यामुळे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अन्य विषयांमधूनही पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची निवड करता येईल.विषयाची निवड करताना कोणतीही सक्ती विद्यार्थ्यांवर असणार नाही. 


दरम्यान, निवडलेले दोन्ही अभ्यासक्रम विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थितीच्या माध्यमातून पूर्ण करू शकणार आहेत. एक अभ्यासक्रम प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून, तर दुसरा अभ्यासक्रम दूरशिक्षण अथवा ऑनलाईन स्वरूपात करता येईल. दोन्ही अभ्यासक्रम ऑनलाईन किंवा दूरशिक्षण पद्धतीमध्ये असू शकतात, असे डॉ. मोरे यांनी यावेळी नमूद केले. 


युजीसीकडून शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण विभागाला मान्यता 


दरम्यान, युजीसीकडून मान्यता मिळालेल्या बी.ए., बी.कॉम., एम.ए. भाषा (इंग्रजी, हिंदी, मराठी), एम.ए. सामाजिकशास्त्र (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र), एम.कॉम., एम.एस्सी. (गणित), एम.बी.ए. या पदवी व पदव्युत्तर विषयांची शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 


ही प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन असून कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यांतील 81 अभ्यास केंद्रांमध्ये विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, सैनिक, उद्योजक, शेतकरी, कामगार व बंदीजन आदी शिक्षणापासून वंचित घटकांना प्रवेश घेता येणार आहे. 


विद्यापीठाच्या http://www.unishivaji.ac.in/ वेबसाईटवर http://www.unishivaji.ac.in/distedu/ या सेक्शनमध्ये प्रवेशाबाबत सविस्तर माहिती उपलब्ध आहे. दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या सर्व अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता मिळाल्याने ज्या व्यक्ती व्यवसाय, नोकरी व अन्य कारणांमुळे प्रवेशापासून वंचित आहेत तसेच ज्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले आहे, अशा व्यक्तींनी सदर अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांनी अभ्यासक्रमांना मान्यता मिळाल्यानंतर केले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या